सुलभ प्रवासासाठी ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम

15 Jan 2024 18:00:26
One vehicle, one Fastag News

नवी दिल्ली
: इलेक्ट्रॉनिक पथकर प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि पथकर नाक्यांवर विनाअडथळा वाहतूक प्रदान करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम सुरु केला आहे.

अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका विशिष्ट वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडणे या वापरकर्त्याच्या वर्तनाला चाप लावण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फास्टॅग’वापरकर्त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवायसी अपडेट करून त्यांच्या नवीनतम फास्टॅगची ‘नो युअर कस्टमर ’ (केवायसी ) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.वैध शिल्लक असलेले परंतु केवायसी अपूर्ण असलेले फास्टॅग 31 जानेवारी 2024 नंतर बँकांद्वारे निष्क्रिय/काळ्या यादीत टाकले जातील

गैरसोय टाळण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या नवीनतम फास्टॅगचे केवायसी पूर्ण केले आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. फास्टॅग वापरकर्त्यांनी ‘एक वाहन, एक फास्टॅग’ चे देखील पालन केले पाहिजे आणि संबंधित बँकांद्वारे पूर्वी जारी केलेले सर्व फास्टॅग काढून टाकावेत, असे आवाहन एनएचएआयतर्फे करण्यात आले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे उल्लंघन करून केवायसीशिवाय एका विशिष्ट वाहनासाठी एकाहून अधिक फास्टॅग जारी केले जात असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उपक्रम सुरु केला आहे. याशिवाय, वाहनाच्या समोरील काचेवर काहीवेळा फास्टॅग जाणीवपूर्वक चिकटवले जात नाहीत, परिणामी पथकर नाक्यांवर अनावश्यक विलंब होतो आणि राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांची गैरसोय होतो, हा प्रकारही नव्या उपक्रमामुळे बंद होणार आहे.



Powered By Sangraha 9.0