उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे वाटोळे : आ. दरेकरांचा हल्लाबोल

14 Jan 2024 19:48:04
MLC Pravin Darekar on Uddhav Thackeray
 
अकोला : गेली अनेक वर्ष आपले राज्य मागे गेले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे झाले. महाराष्ट्र ठप्प होता, असा जोरदार हल्लाबोल भाजप विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी अकोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात केला. तसेच आपल्याला या देशासाठी काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला कर्तव्यदक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका पार पडायची आहे, असे आवाहनही दरेकरांनी यावेळी केले.

या मेळाव्याला भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी, माजी आ. गोपीकिशन बजोरिया, कृष्णा अंधारे, तुकाराम बिडकर, विजय देशमुख, अश्विन नवले विजय अग्रवाल, अनिल धोत्रे यांसह महायुतीतील १५ घटक पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

या मेळाव्यात बोलताना दरेकर म्हणाले की, अकोला जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे. ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याचे वेगळे स्थान आहे. अकोल्यातील या मेळाव्याकडे आज सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अनेक वक्त्यांनी महायुतीचा मेळावा कशासाठी? याचा उल्लेख केला. परंतु आपल्याला या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला, अकोल्यातील जनतेला सांगू इच्छितो की आता राजकारणाची दिशा बदलली आहे.

अजित पवार यांचीही प्रशासनावर पकड आणि जरब आहे. म्हणजे तिन्ही क्वालिटीचे तीन नेते एकत्र झाल्यावर महाविकास आघाडीची आपल्यासमोर डाळ शिजेल का? असा सवाल करत दरेकर म्हणाले की, तीन बलाढ्य नेते आज एकत्र आहेत. पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आहे. जिल्ह्याजिल्ह्यात तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची फौज एकदिलाने काम करण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यामुळे येणारा काळ हा आपला असल्याचेही दरेकर म्हणाले.

आगामी काळात विकासामध्ये देशात महाराष्ट्र राज्य सर्वात पुढे असेल

दरेकर म्हणाले की, राज्याचे तिन्ही नेते भक्कम आहेत. ज्यावेळी सरकार स्थापन झाले केंद्राने हजारो कोटींचा निधी आपल्याला दिला. उबाठा सरकार असताना त्यांना दिल्लीला जायला लाज वाटत होती. घरात बसून राज्याचा कारभार चालवला.अडीच वर्षाच्या काळात राज्यातील जनतेला अभिमान वाटेल असे काम केले नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस, अजित पवार वारंवार दिल्लीला जाताहेत. प्रश्न मानअपमानाचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. तिन्ही नेते दिल्लीला गेल्यावर कधीच खाली हात आले नाही. करण आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला भरभरून देताहेत. येणाऱ्या काळात विकासामध्ये देशात सर्वात पुढे असणारे राष्ट्र असेल तर महायुतीचे सरकार असलेले महाराष्ट्र राज्य असेल, असा विश्वास दरेकर यांनी दिला.

Powered By Sangraha 9.0