सदा प्रफुल्लित पल्लवी...

14 Jan 2024 20:50:20
Article on Pallavi Chaudhari

घरातली लाडकी अल्लड मुलगी जेव्हा मुख्याध्यापिका होते, तेव्हा आलेल्या जबाबदार्‍यांसोबत एक मराठी माध्यमाची संस्था टिकवण्यासाठी, एकाकी लढा देणारी पल्लवी चौधरी हिची यशोगाथा...

कुरळे केस रिबीन बांधून, दोन्ही खांद्यावर सोडून, दोन्ही गालांवर खळ्या नाचवत, लहानशी पल्लू गावभर नाचायची. तिला फक्त गप्पा मारायला आवडायच्या. सगळ्या आते, मामे, चुलत भावांडांत पल्लू धाकटी. सगळ्यांची लाडकी. सगळे काका, मामा, काकू, आत्या, दादा आणि वहिनीसुद्धा तिचे लाड करत. लहान मुलांपासून आजोबांपर्यंत कोणीही तिला चालत असेल. स्वभाव असा गप्पिष्ट!

प्रश्न विचारून भंडावून सोडणं नित्याचच. वडील मुख्याध्यापक होते. त्यामुळे विद्येची भूक घरातच भागत होती. एकपाठीच होती ती. एकदा वाचलं, समजून घेतलं की पाठ! गणितं सोडवायला आवडायची. गणित आवडीचा विषय. शाळेत नेहमी पहिल्या पाचात क्रमांक. दहावीच्या वर्षी नेटाने अभ्यास केला आणि तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकवला. झालं. सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या. सर्व काका-काकूंना, आई-बाबांना वाटत होतं, लाडूबाईने डॉक्टर व्हावं. हुशार आहे, घरची परिस्थितीसुद्धा उत्तम तेव्हा काहीही अडचणी येणार नाहीत. उलट घराला एक डॉक्टर मिळेल. पल्लूला मात्र ’सीए’ करायचं होतं. तिचा ओढा शब्दांपेक्षा अंकांकडे जास्त. पण, एवढे लोकं म्हणतात, म्हणून तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मित्र मैत्रिणी मिळाले. कॉलेज लाईफ की काय म्हणतात, ती सुरू झाली. अभ्यास मात्र सुरूच होता. वसईहून पार्ल्याला फेर्‍या होऊ लागल्या. साठे महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बरोबरीनेच योग वर्ग सुरू होते. आतापर्यंत जर्दाळू असलेली पल्लू बारीक झाली. व्यस्त झाली.

शेवटी तिच्या ओढ्याप्रमाणे तिने बीजगणित घेऊन ’एमएससी’ केलं आणि पुन्हा आपल्या गणिताकडे आली. एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. ती शाळा होती, शिशु विकास विद्यालय. शिशुसाठी सुरू झालेली मात्र एक-एक इयत्ता वाढत गेली आणि दहावीच्या वर्गापर्यंत संख्या गेली. शाळेत विज्ञान आणि गणित असे दोन विषय शिकवायला असायचे. तिच्या दादाला बाळ झालं होतं त्याचवेळेला. कधी एकदा शाळा सुटते आणि आपण घरी जाऊन बाळाला घेतो, असं तिला व्हायचं. याच वेळेस लग्न जमलं. पल्लू आता मोठी झाली होती. सगळ्यांची दीदी झाली होती. लग्न झालं आणि शाळेतून मुख्याध्यापक होशील का, अशी विचारणा झाली. नवनवा संसार, अगदी हवा तसा भरपूर प्रेम करणारा नवरा आणि भरलेलं घर. ती नको म्हणाली आणि पहिली संधी हुकली. घरच्यासारखी शाळेतही ती लाडूबाईच होती. संस्थाचालक अगदी घरी येऊन सांगून गेले, पल्लवीकडे व्यवस्थापन कौशल्य, बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर नीतिमत्तासुद्धा आहे, वय लहान असले, तरीही ही जबाबदारी ती लीलया पेलू शकेल.

हळूहळू काळ लोटला. तिला जग दिसू लागलं आता. मराठी माध्यमाची शाळा. सरकारी अनुदान तेव्हा कमी फी आकारून मुलांना प्रवेश घेता येत असे. कांदिवली म्हणजे मुंबईचं उपनगर. दूरवरून आलेली, काम शोधत असलेली गरजू लोकं इथे खोल्या घेऊन राहत. सोबत लग्न झालं, असेल तर बायको असेच आणि ओघाने मुलं. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च कसा करणार? दोन वेळचं जेवणाचं भागवताना नाकी नऊ येत. मग त्या कसं बसं उरकून येणार्‍या मुलांकडे पाहताना, पल्लवीतील आई जागृत व्हायची. माया वाटायची; पण तिला काही बाळ होत नव्हतं. पाहता-पाहता दहा वर्षं लग्नाला होऊन गेली. हसती खेळती पल्लू कुठे दडून बसली. तो अवखळ जिज्ञासू स्वभाव कुठे दडी मारून बसला. डोळे वारंवार ओले होऊ लागले.

तिने सगळ्या आशा सोडल्या आणि एक दिवस एका नव्या स्वप्नाची चाहूल लागली. नऊ महिन्यांत ते अप्रूप जीवंत होऊन घरात आलं आणि त्या गालावरच्या दोन खळ्या पण मग पुन्हा आल्या. सगळ्यांचा आनंद, प्रेम जिंकून घेणारी जित्वरी आली होती. आता तिची धावपळ अजूनच वाढली. अर्थातच चिंता आसपास घोळू लागल्या. ताण जाणवू लागला. केसांना रंग येऊ लागला. यावेळी तिने स्कूल गायडन्स डिप्लोमा कोर्स केला. मुलांच्या मानसशास्त्रासंबंधी अभ्यास होऊ लागला आणि मग पुन्हा एकदा मुख्याध्यापकपद आलं. यावेळी तिने ते स्वीकारलं. आयुष्यात जबाबदारी अशी पहिल्यांदाच चालून आली आणि त्यापाठोपाठ एक जीवाला घोर लावणारी चिंता. शाळेच्या अस्तित्वासाठी संघर्ष!

मराठी माध्यमाच्या शाळा फारशा चालत नाहीत. पण, एकदम बंदही होत नाहीत. शाळा तर टिकायला हवी. संस्थेलाही ही फार न चालणारी शाळा टिकवण्यात काही रस नाही. तेव्हा शिक्षकांसोबत मुलांचाही सर्वांगीण विकास व्हावा आणि शाळेकडे मुलांचा ओघ येत राहावा, यासाठी झटत असते. एकहाती शाळा चालवते. मुलीकडे पाहते आणि घरचंसुद्धा करते. भाऊ असला तरीही आईकडेही लक्ष देते. तिचं हवं नको, आरोग्य तपासण्या सगळ्याकडे लक्ष देते. आई कशीही असली, कशीही वागली तरी आई आहे, म्हटल्यावर तिचं करायलाच हवं, ही जाण तिला आहे. कर्तव्यात चुकत नाही, तीच खरी वृत्ती. जिला पाहताच चित्तवृत्ती फुलून याव्यात, अशा या बाई, पल्लवी बाई. त्यांच्या शाळेसाठी आणि शाळेच्या लढ्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0