मुंबई : 'ह्युंदाई' ही प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी पुण्यात ७ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १३ डिसेंबर रोजी याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र येऊ घातलेल्या ह्युंदाईच्या प्रकल्पाचे स्वागतही केले.
ह्युंदाई मोटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किम उनसू, कार्यकारी संचालक जे. डब्ल्यू. ऱ्यू आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ह्युंदाई मोटार इंडियाच्या माध्यमातून पुण्यातील तळेगाव येथे ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांना दिली.
ह्युंदाईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुण्यातील प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध पैलूंवर सल्ला आणि सहाय्य देखील मागितले. संबंधित प्रकल्पाला आमच्या सरकारच्यावतीने संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ह्युंदाईने गेल्या २५ वर्षांत तामिळनाडूत मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, तामिळनाडूबाहेर ही त्यांची पहिलीच गुंतवणूक आहे. पुण्यातील या प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यासाठी पुढील आठवड्यात दावोसला भेट देणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.