२० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ संपन्न

12 Jan 2024 22:04:54
Asian Culture Award Winner Ramesh Sippy

मुंबई :
जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून सुरुवात झाली. याप्रसंगी ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सिप्पी म्हणाले, "सिनेमा हे माझं जग आहे थिएटर हे माझं घर या गोष्टीपासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही. 'एशियन कल्चर’ पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी एशियन फिल्म फाऊंडेशनचा ऋणी असून हा पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारतो", असे ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितले.

"या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा तसेच कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे", असे मत चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश झोटिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
दरम्यान, या चित्रपट महोत्सवात प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट समीक्षक कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘सत्यजित रे’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0