मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० जानेवारी २०२४ ला दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे. ठाकरे गटाचे १४ आमदार किंवा शिवसेनेचे १६ आमदार यांच्यावर या निकालाअंतर्गत कारवाई होऊ शकते.
या प्रकरणात दोन्हा गटांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत याचिका दाखल केल्या होत्या. यात जरी ठाकरे गटाच्या विरोधात आमदार अपात्रतेची कारवाई झाली तरी आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके या दोन आमदारांना मात्र अपात्रतेचा धोका नाहीये.
अंधेरी पुर्वच्या आमदार ऋतुजा लटके या शिवसेनेच्या विभाजनानंतर पोटनिवडणूकीमध्ये आमदार झाल्या होत्या त्यामुळे ठाकरे गटाच्या विरोधात जरी निकाल आला तरी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही. दुसरे आहेत आमदार आदित्य उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे यांनी उबाठा च्या आमदारांवर अपात्रतेसाठी याचीका दाखल करताना आदित्य ठाकरेंचे नाव बाळासाहेब ठाकरेंचे नातू असल्याने बगळले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्यातील जनतेतून निवडून आलेले ते पहीले आमदार असल्याने बाळासाहेबांचा आदर म्हणुन त्यांनी आदित्य ठाकरेंचे नाव अपात्रतेच्या याचिकेतुन वगळले होते त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणार नाही.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर हिवाळी अधिवेशनावेळी मॅरेथॉन सुनावणी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले होते. राहूल नार्वेकर बुधवारी १० जानेवारीला संध्याकाळी चार वाजता यावर निकालाचे वाचन करणार आहेत. या निकालावर शिवसेना पक्ष आणि उबाठा गटाते राजकीय भवितव्य अवलंबून आहे. हा निकाल सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे अस राहूल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.