पाण्यातील संकटग्रस्त मासे

01 Jan 2024 21:18:17
IUCN Red List Report on Extinction Threat to Freshwater Fish
 
वाढती लोकसंख्या, मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप या सगळ्यांचा परिणाम हवामान आणि वातावरण बदलावर होतो, हे सर्वश्रुत. पर्यावरणातील हे बदल अनेक परिसंस्थांवर गंभीर परिणाम घडवून आणतात. अशाच प्रकारचे गंभीर परिणाम गोड्या पाण्यातील माशांवर होत असल्याचे नुकतेच ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (IUCN)च्या ’रेड लिस्ट’च्या मूल्यांकनातून समोर आले आहे.

’आययुसीएन’ची लाल यादी संकटग्रस्त, धोक्यात असलेल्या प्रजाती अशा वेगवेगळ्या स्तरांमध्ये वर्गवारी करत असते. या वर्गवारीमधून संकटग्रस्त, नामशेष झालेल्या, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या असे स्तर समजल्यामुळे त्या-त्या प्रजातीचे संरक्षण, संवर्धन योग्य पद्धतीने करता येते. हवामान आणि वातावरणीय बदल पाण्याच्या स्तर आणि गुणवत्तेमध्येही बदल घडवून आणतात. वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा दर्जा खालावल्याने, या परिसंस्थेतील घटकांवर त्याचे परिणाम दिसून आले आहेत. ’आययुसीएन’ने मूल्यांकन केलेल्या १४ हजार, ८९८ प्रजातींपैकी ३ हजार, ८६ प्रजातींना नामशेष होण्याचा धोका असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी गोड्या पाण्यातील १७ टक्के प्रजातींचाही समावेश आहे. पाण्याची पातळी कमी होणे, बदलते ऋतुमान, समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी अशा विविध कारणांमुळे गोड्या पाण्यातील प्रजाती या धोक्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ५७ टक्के गोड्या पाण्यातील माशांना संयुगांचा धोका, ४५ टक्के माशांना धरणाचा धोका, तर २५ टक्के प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात असल्याचे सांगितले जाते.

समुद्रातील प्रदूषणामुळे सागरी परिसंस्था धोक्यात आहेच; पण गोड्या पाण्यातील परिसंस्थेला विशेषतः केवळ माशांच्या प्रजातीतील एक चतुर्थांश प्रजातींवर नामशेष होण्याची टांगती तलवार असणे, ही गंभीर आणि चिंताजनक बाब. हवामान बदलामुळे या प्रजातींच्या संपूर्ण जीवनचक्रावर परिणाम झाला. कमी वयातच या प्रजातींच्या विकासावर तसेच इतर गोष्टींवर परिणाम झाले आहेत. शिकार उपलब्धता कमी झाली असून, आक्रमक परदेशी प्रजातींच्या अतिक्रमणामुळे स्थानिक प्रजातींवर बंधने येतात. ‘रेड लिस्ट’च्या मूल्यांकनातून असेही समोर आले की, मध्य-दक्षिण प्रशांत महासागर आणि पूर्व प्रशांत महासागर या भागातील ‘ग्रीन सी टर्टल’ची संख्या पूर्वी ‘संकटग्रस्त’ किंवा ‘असुरक्षित’ या स्तरामध्ये होती, जी आता ’नामशेष’ या गटामध्ये समाविष्ट झाली आहे. या कासवांच्या मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे, औद्योगिक आणि व्यावसायिक मासेमारी असल्याचेही सांगितले जाते. तापमानवाढीच्या परिणामांचा ‘ग्रीन सी टर्टल्स’ला मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. ज्यामुळे या कासवांना त्यांची अंडी उबवण्यास अडथळा येऊन, त्यांना यश मिळत नाही. समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर, या कासवांच्या घरट्यांना पूर येऊन त्यांची पिल्लेदेखील बुडतात.

गोड्या पाण्यातील किमान १७ टक्के माशांच्या प्रजातींवर रोगाचे किंवा आक्रमक प्रजातींचा परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे केवळ माशांनाच नाही, तर जलीय परिसंस्थेतील इतर घटक, उभयचर आणि इतर अनेक परिसंस्थांमधील प्रजातींना धोका असल्याचे लक्षात येते. संशोधकांना मिळालेल्या नवीन पुराव्यांवरून असेही आडळून आले आहे की, ‘अटलांटिक सॅल्मन’ या प्रजातीच्या माशांची (साल्मो सालार) जागतिक लोकसंख्या २००६ ते २०२० दरम्यान २३ टक्क्यांनी घसरली आहे, ज्यामुळे ही प्रजात ‘सर्वात कमी धोका’ असलेल्या स्तरावरून आता थेट ’संकटग्रस्त’ प्रजात झाली आहे.

नुकत्याच झालेल्या ’कॉप २८’ या हवामान आणि वातावरणीय बदल परिषदेतही याविषयीच्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करत, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हवामान आणि वातावरणीय बदल, त्यांच्या परिणामांना गेली काही वर्षे गांभीर्याने बघितलं जात असलं, ही समाधानकारक बाब असली, तरी तितकेच करणे आज नक्कीच पुरेसे नाही. त्यावर ठोस कृती गरजेची आहे. तेव्हा, या नवीन वर्षात अशी आशा करुया की, एकूणच जलचर आणि अन्य प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्नही अधिक व्यापक होतील.
Powered By Sangraha 9.0