गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

    09-Sep-2023
Total Views |

farmer
 
ठाणे : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा (सानुग्रह अनुदान) योजनेत २०२२ मध्ये कोकण विभागात शेतकऱ्यांच्या वारसदारांना ३ कोटी ६९ लाख अदा करण्यात आले. तर ऑगस्ट २०२३ पर्यत ४३ लाख अदा करण्यात आले. दरम्यान गतवर्षी व यंदा ठाणे जिल्हयात एकुण ४६ लाख रुपये इतकाच निधी शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

शेतीमध्ये काम करताना किंवा इतर कारणास्तव अपघात होऊन कुटुंबातील कर्ता पुरुष मरण पावल्याने अथवा गंभीर जखमी झाल्याने कुटुंबाची वाताहत होते. अशावेळी शासनाकडून शेतकरी कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. आता तीचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना केले आहे. दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन निर्णय काढून दि. ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ हा खंडित कालावधी म्हणून जाहीर केला आहे. या खंडित कालावधीमध्ये कोकण विभागातून पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयातील एकूण ३ कोटी २६ लाख इतका निधी शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या खाती जमा करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे जिल्हयात ३८ लाख तसेच, पालघर जिल्हयात ४८ लाख रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आली. 

त्याचप्रमाणे रायगड जिल्हयात ८६ लाख तर रत्नागिरी जिल्हयात ७२ लाख आणि सिंधुदुर्ग जिल्हयात ८० लाख रुपये वारसदारांना देण्यात आले. त्याचप्रमाणे १९ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोकण विभागात एकूण ४३ लाख रुपये निधी वाटप करण्यात आला. यामध्ये ठाणे जिल्हयात ८ लाख तसेच पालघर जिल्हयात ६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. त्याचप्रमाणे रायगड जिल्हयात १० लाख तर रत्नागिरी जिल्ह्यात ९ लाख आणि सिंधुदुर्ग जिल्हयात १० लाख रुपये वारसदारांच्या खाती जमा करण्यात आले आहेत. अशी माहिती कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.