फडणवीसांनी वरळीत फोडली परिवर्तनाची हंडी; भाजपकडून उबाठाला पुन्हा धोबीपछाड

    07-Sep-2023
Total Views |
Deputy CM Devendra Fadnavis At Jambori Maidan Worli

मुंबई :
गेल्या काही वर्षांपासून राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने उबाठा गटाला धोबीपछाड दिली आहे. वरळीतील प्रतिष्ठित अशा जांबोरी मैदानावर सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचे यशस्वी आयोजन करून भाजपने सरशी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. ७ सप्टेंबर रोजी भाजप नेते आणि दहीहंडी पथकांच्या उपस्थितीत जांबोरी मैदानातील 'परिवर्तन' हंडी फोडली आहे. भाजप नेते संतोष पांडे यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

मागील वर्षी शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांमधील अंतर्गत कलह, शिंदे आणि अहिर यांच्यातील शीतयुद्ध आणि भाजपचा पवित्रा याचा फायदा घेत भाजपने जांबोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन करण्यात यश मिळवले होते. युवराज आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत गेल्या काही वर्षांपासून भाजपने आपली स्थिती मजबूत केली असून उबाठा गटाला शह देण्यात अनेकदा यश मिळवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मानाची हंडी समजल्या जाणाऱ्या वरळीतील मैदानावरील दहिहंडीवर भाजपने अपील प्रभुत्व मिळवले असून येत्या काळात दोन्ही पक्षातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.