समाजातील दुर्लक्षित महिला घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवेदिता कच्छवा अविरत कार्यरत आहेत. पर्यायाने सरकारी नोकरी सोडून त्यांनी ‘सेवा परमो धर्मः’ हे व्रत स्वीकारले आहे. त्यांच्याविषयी...
निवेदिता कच्छवा यांना शालेय वयातच सामाजिक कामाची आवड तरुणपणामध्येही स्वस्थ बसू देत नव्हती. संघ परिवाराची घरातील शिकवण व योगायोगाने सासरही संघ परिवारातील मिळाल्याने आणखी काम करण्याची त्यांची ऊर्मी वाढली. मग, कधी वाड्यावस्त्यांवर जाऊन शिक्षणाची जनजागृती करणे, तर कधी महिलांसाठी काम करण्यासाठी दिवसरात्र त्या झटत असतात. विशेषतः प्लास्टिक हटाव, चिनी वस्तूंना विरोध आणि ‘मेक इन इंडिया’वर अधिक काम सुरू आहे. विद्यार्थी परिषद, स्वदेशी जागरण मंच, भारतीय स्त्री शक्ती जागरण, सावरकर मंडळ, स्व. तात्या बापट स्मृती समिती, ग्राम विकास गतिविधी अशा अनेक संस्थाशी त्या निगडित असून त्यांचे अखंडपणे काम सुरू आहे.
निवेदिता यांचे बालपण संभाजीनगरमध्ये गेले. शालेय वयापासूनच ‘सेवा परमो धर्म:’ असे संस्कार झाल्याने देश व आपला धर्म टिकविण्यासाठी त्या कार्यरत आहेत. इतिहास विषयाची प्रचंड आवड असल्याने त्यांनी इतिहासामध्ये ‘एमए’ केले. पुढे सामाजिक कामाच्या माध्यमातून देशसेवा करावी, हा विचार करून ‘महाराष्ट्र लोकेसवा आयोगा’ची परीक्षा देणे निवेदिता यांनी सुरू केले. महिलांना येणार्या अडचणी व त्या सोडविण्यासाठी कायदेशीर मार्गाचाही अवलंब करावा लागतो, हे जाणून कौटुंबिक समुपदेशन, विवाह समुपदेशन असे कोर्स केले. या माध्यमातून आतापर्यंत शेकडो महिलांना दिलासा मिळाल्याचे निवेदिता सांगतात.
कामानिमित्त कधी मुंबई, तर कधी पुणे असे वास्तव्य त्यांना करावे लागत होते. पुढे लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. माहेर, आजोळ संघ परिवारामुळे कामाची ऊर्जा मात्र त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. त्यांच्या घरातील सर्व उच्चपदावर कार्यरत. त्यांचे भाऊ नांदेड विद्यापीठात प्र-कुलगुरू, बहीण जिल्हा न्यायाधीश आणि पती कंपनीत जनरल मॅनेजर असल्याने निवेदिता यांनाही अधिकारी होण्याची इच्छा झाली. मग, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर ‘सेल्स टॅक्स ऑफिसर’ म्हणून त्यांनी सेवा पत्करली. पण, पुढे समाजासाठी आणि त्या कामासाठी ती नोकरी सोडून आता २४ तास सामाजिक कार्याशी निगडित आहे.
ठरवून सेवा करायची असे निवेदिता यांच्या मनात अजिबात नव्हतेच. मुळात चांगली नोकरी आणि सर्व सुखसोयी असल्याने हा विचार केला नाही. पण, अगदीच रस्त्याने जाताना अथवा कोणी मदत मागितली, तर मी तेथे धावून जायची. तुळजापूरहून येथे जात असताना, रस्त्यावर भयानक अपघात पहिला. बघ्याची भूमिका घेणारी गर्दी पाहताच निवेदिता यांनी गाडी बाजूला लावली. त्यांच्या बहिणीने पोलिसांना संपर्क केला. तोपर्यंत त्यांच्या भावाने इतर वाहन थांबावून बेशुद्ध महिला व ११ वर्षांचा मुलगा या दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. तो दिवस होता-भाऊबीजेचा. पुढे कार्यक्रमाला उशीर झाल्याचे दुःख नव्हते. पण, सर्व भावंडांनी दोघांचे प्राण वाचवल्याचे समाधान अधिक झाल्याचे निवेदिता सांगतात. तेव्हापासूनच म्हणजे २००१ पासून सामाजिक काम करण्याचे मनात ठरवले आणि त्या बाजूने पूर्ण झोकून दिले. पण, सुरुवात कोठून करायची, याचा विचार करीत असताना, गावात वाड्यावस्त्यांवरील मुलींच्या आरोग्याविषयक काम करण्याचे त्यांनी ठरविले. तेथून कामाची अधिक आवड निर्माण झाली.
मग वाड्यावस्त्यांवर ‘किशोरी विकास प्रकल्पा’अंतर्गत किशोरवयातील मुलींना मार्गदर्शन आणि आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू केले. अशा सेवा वस्त्यांमध्ये महिलांसाठी ‘आर्थिक सबलीकरण योजने’अंतर्गत विविध उपक्रम राबविले. उदरनिर्वाहासाठी कपड्यांना लावण्याचे चिमटे, कागदी पिशव्या बनवणे, जुन्या कपड्यांपासून पायपुसणी यांसारखे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले. समाजाने अधिकाधिक स्वदेशीचा वापर करण्यासाठी, त्या कायम आग्रही असत. वस्तीत राहणार्या महिला, मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांच्या समवेत दिवाळी व इतर सण साजरे करण्यात येतात.
विविध शाळेत ‘स्पर्शज्ञानाचे’ कार्यक्रम मोफत घेण्यात आले. त्यातून मुलींना बोलते करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असल्याने अनेक व्याधी जडतात. त्यामुळे शेंगदाणा लाडू गोळा करून त्या महिलांना पुरविण्यात आले. तसेच, मुलांना वह्या आणि पुस्तके पुरविण्यात आले. यापुढे जाऊन ‘चायना हटाव, भारत बचाव’, ‘मेक इन इंडिया, मेड इन इंडिया’, ‘१०० टक्के मतदान’, ‘देशहितासाठी मतदान’, ‘हम भारत की नारी,’ या विषयांवर जनजागृती केली. तसेच, पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना त्याची माहिती देण्याचे उपक्रम राबविण्यात आले होते. ‘कोविड’ काळात ९०० जणांचे समुपदेशन केले. ज्येष्ठांना औषध, भाज्या, किराणा घरपोच देणे, अशी सेवा घडली.
नुकत्याच झालेल्या ‘स्वराज्य ७५’ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ३५०हून अधिक कार्यक्रम त्यांनी आयोेजित केले होते. देशाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच स्थानिक अपरिचित क्रांतिकारक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरला. याचबरोबर सुरू केलेल्या कामात आता बर्याच महिला सहभागी झाल्या आहेत. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रआराधना हे लहान वयात मुलांवर करण्याचे संस्कार होणे महत्त्वाचे असल्याने संस्कार वर्ग सध्या सुरू आहेत. कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करण्यार्या निवेदिता कच्छवा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा
पंकज खोले
(अधिक माहितीसाठी संपर्क- ९९२१२०२६५०)