सनातनविरोधी उदयनिधी स्टॅलिन यांना अटक झालीच पाहिजे!; 'विहिंप'चा आक्रमक पवित्रा

06 Sep 2023 20:33:52
Vishwa Hindu Parishad On MK Stalin Son Statement

मुंबई :
"तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. जर्मनीत हिटलरने ज्यू लोकांबद्दल जी भाषा केली होती, त्याप्रमाणे उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं हे विधान आहे. त्यामुळे अशा सनातनविरोधी स्टॅलिनना अटक झालीच पाहिजे.", असे म्हणत विश्व हिन्दू परिषदेचे (विहिंप) प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी बुधवार, दि. ०६ सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. दंगली घडविण्यासाठी व देशात अराजक पसरवून निवडणुकीत फायदा घेण्यासाठी देशविघातक धर्मद्रोही अशा काही राजकीय पक्षांनी आखलेले हे कुटील कारस्थान असावे, असा संशयही विहिंपकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.

स्टॅलिनच्या विधानावर विहिंपची भूमिका मांडत सालेकर पुढे म्हणाले, "लाखो वर्षांची परंपरा असणारा सनातन धर्म विश्व कल्याणकारी आहे. सर्वांना सामावून घेण्याची व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शक्ती केवळ सनातन धर्मात आहे. सनातन धर्म 'वसुधैव कुटुंबकम', 'सर्वेपि सुखिनः संतु' या तत्वज्ञानावर विश्वाला समरस करण्यावर भर देतो. अशा सनातन धर्माला बदनाम करण्याकरिता तथाकथित नेते एक विमर्श स्थापित करू इच्छित आहेत व करोडो हिंदूंच्या, सनातनींच्या श्रद्धेवर थेट आक्रमण करीत आहेत."

पुढे ते म्हणतात, "सनातन धर्माची तुलना विषाणूंसोबत करणे, त्याचे उच्चाटन करण्याची भाषा वापरणे हे असंविधानिक तर आहेच, परंतु स्टॅलिनसारख्या संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे म्हणजे थेट संविधानाचे उलंघन व त्याचा अपमान करण्यासमान आहे. त्यामुळे कलम २५ व २६ अंतर्गत स्टॅलिनविरोधात सर्वोच्च न्यायालयाने स्वसंज्ञान घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे."

विरोधकांच्या इंडिया आघाडीवरही यावेळी सालेकर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "२०२४ ला येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सध्या अशी हिंदू विरोधी विधानं केली जात आहेत. जिहादी मानसिकता असलेली ही त्यांची भाषा आहे. स्टॅलिन हे इंडिया आघाडीतीलच एक नेते आहेत. त्यामुळे स्टॅलिनच्या विधानावर इंडिया आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांचे न बोलणं म्हणजे त्यांचाही सनातन धर्माला विरोध आहे; हेच सिद्ध होतं. त्यामुळे अशाप्रकारच्या सनातन विरोधी कुठल्याही षडयंत्राला कायदेशीर आणी रस्त्यावर चोख उत्तर द्यायला विश्व हिंदू परिषद सर्व सनातनींच्या सहकार्याने सक्षम आहे. आमच्या धैर्याची परिक्षा घेऊ नका. हिंदू समाजाला गृहीत धरून त्यांचा व त्यांच्या श्रद्धांचा अपमान यापुढे खपवून घेतला जाणार नाही." उदयनिधी स्टॅलिनचे जिथे जिथे कार्यक्रम होतील, तिथे त्यांना विहिंपकडून काळे झेंडे दाखवण्यात येतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान 'विहिंप'चे प्रांत सहमंत्री श्रीराज नायर म्हणाले, की "२०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी विधानं केली जात असून इतर धर्मीयांना (मुस्लिमांना) एकत्र करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. स्टॅलिनच्या सनातन विरोधी वक्तव्याला मल्लिकार्जुन खरगेंचा मुलगा असो किंवा इंडिया आघाडीतील घटक पक्ष; सर्वांकडून समर्थन होताना दिसतंय. याविरोधात विहिंपच्या देशभरात पत्रकार परिषदा सध्या सुरू आहेत."

देशाला भारत म्हणून संबोधणे हे योग्यच!

देशाचे नामांतर इंडियातून भारत या मूळ नावात व्हावे या केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर विहिंपची बाजू मांडत सालेकर म्हणाले, "देशातून गुलामिची चिन्हं नष्ट झालीच पाहिजेत. इंडियाचे भारत होणं हे स्वागतार्ह आहे. खरंतर १९४८ लाच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. विरोधकांकडून याला विरोध होत असेल तर त्यांनी भारताचे संविधान पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. ज्या देशात ज्ञानाचा महासागर वाहतोय त्याला भारत म्हणून संबोधणे हे योग्यच."



Powered By Sangraha 9.0