हरियाणातील गिधाडे लवकरच विदर्भात

05 Sep 2023 18:40:16
vultures


मुंबई (समृद्धी ढमाले):
 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) हरियाणा येथील गिधाड प्रजनन केंद्रामधील गिधाडांच्या २० जोड्या विदर्भात सोडण्यात येणार आहेत. विदर्भातील पेंच, ताडोबा अंधारी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प अशा तीन ठिकाणी ही गिधाडे सोडण्यासाठी 'बीएनएचएस'ची तयारी सुरू आहे.
 

परिसरातील प्राणी आणि माणसांचे शव गिधाडे खात असल्यामुळे स्वच्छता होते. पण, गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे जैवविविधतेचे चक्र काहीसे बिघडले आहे. त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी बीएनएचएसने भारतातील हरियाणा आणि भोपाळ येथे प्रजनन केंद्र उभारलेली आहेत. हरियाणातील पिंजोर येथे बीएनएचएसचे गिधाड प्रजनन केंद्र आहे. इथे व्हाईट बॅक्ड, लॉंग बिल्ड आणि स्लेंडर बिल्ड गिधाडांचे गेली अनेक वर्ष संवर्धन आणि यशस्वी प्रजनन केले आहे. याच प्रजनन केंद्रातील गिधाडांच्या २० जोड्या आता विदर्भात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहेत. या २० जोड्यांची निवड अद्याप केली गेली नसुन स्थानांतरणाची तारीख निश्चित झाल्यानंतर ती केली जाणार आहे.

 
गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडताना ठराविक प्रक्रिया राबविली जाते. गिधाडांचे स्थलांतर केल्यानंतर त्यांना प्री रिलीझ एव्हियरी म्हणजेच मुक्त अधिवासात सोडण्याआधी तयार केलेला विशीष्ट पिंजऱ्यात ठेवले जाते. पेंच, ताडोबा अंधारी आणि मेळघाट या ठिकाणी या एव्हियरिज तयार करण्यात येणार असून त्यांचे काम सुरू आहे. गिधाडांच्या २० जोड्या निवडून त्यांना कलर टॅग व पि.टि.टी लावून सोडले जाणार आहे.



kishor rithe



Powered By Sangraha 9.0