'सत्यशोधक' चित्रपटाच्या पोस्टरचे मंत्री छगन भूजबळ यांनी केले अनावरण

05 Sep 2023 16:19:06
 
satyashodhak
 
 
 
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेला चित्रपट म्हणजे ‘सत्यशोधक’. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांचे जीवन मोठ्या पडद्यावर उलगडले जाणार आहे. नुकतेच या पोस्टरचे अनावरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर छगन भुजबळ यांना दाखविण्यात आला व लवकरच हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. यावेळी छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सर्व टीमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
 
‘सत्यशोधक’ या चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंनी समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष, आधुनिक महाराष्ट्राच्या विकास, कामगार चळवळ, महिलांचा शैक्षणिक विकास, आधुनिक इमारतींची बांधणी या सगळ्यांत केलेली कामगिरी व त्यांचे योगदान आणि या सर्व प्रसंगात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेली साथ व आयुष्यभर केलेले समाजप्रबोधन हे सर्व पैलू चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवण्यात येणार आहे.
 
‘सत्यशोधक’ चित्रपटात महात्मा फुलेंची व्यक्तिरेखा राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी साकारणार असून आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर रंगवणार आहेत. याशिवाय रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा यांसारखे मातब्बर कलाकारही चित्रपटात आहेत. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राज्य पुरस्कार विजेते दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0