मुंबई : सनातन धर्माविषयी अपशब्द बोलणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याविरोधात २६२ व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले आहे. या २६२ व्यक्तींनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
सनातन धर्माची तुलना डेंगू, मलेरिया सारख्या आजारांशी करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात दिल्ली आणि बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी २ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे सनातन निर्मूलन कार्यक्रमात भाग घेतला होता.
या कार्यक्रमात भाषण देताना त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली. उदयनिधी म्हणाले की, "डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना या अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचा केवळ विरोध करता येत नाही, तर त्यांचा नायनाट करणे आवश्यक आहे. सनातन धर्मही तसाच आहे. त्यामुळे त्याचाही नायनट केला पाहिजे"