ठाण्यात वाहतूक उपविभागाच्या हद्दीत 'दहीहंडी' निमित्त बदल

04 Sep 2023 19:47:20
Thane City Traffic Department Takes A Diecision For Gopalkala

ठाणे :
गोपाळकाला अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून ठाण्यातील शहर वाहतूक पोलीस यंत्रणेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत "गोपाळकाला" निमित्त वाहतुकीत सकाळी ७.०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत या कालावधीत बदल करण्यात येईल अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

दरम्यान, वाहतूक उपविभागाच्या हद्दीत दिनांक ०७/०९/२०२३ रोजी सकाळी ०७:०० ते रात्रौ २३:०० वाजेपावेतो "गोपाळकाला " निमित्त टेंभीनाका मित्रमंडळ टॉवर नाका आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व्यापारी मित्र मंडळ, ब्राम्हण सभा हॉल, स्टेशन रोड, बाळगोपाळ मित्र मंडळ, नारळवाला चाळ, स्टेशन रोड, ठाणे या ठिकाणी विविध संघटनांतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर परिसरातील वाहतुक सुरळीत व सुनिश्चित राहावी, यादृष्टीने जनतेच्या सोयीचा निर्णय वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे.

तसेच, दहीहंडी साजरी करण्याकरिता मुंबई व ठाणे परिसरातून मोठया प्रमाणात गोविंदा पथके दहिहंडी फोडण्यासाठी येत असतात. वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे की, ही अधिसुचना दि. ०७/०९/२०२३ रोजी सकाळी ०७:०० ते रात्रौ ११ वाजेपर्यंत अमलात राहील. तसेच, हा वाहतूक बदलाचा निर्णय फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु राहणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणेनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील वाहतूकीय बदल पुढीलप्रमाणे :-

१) जी.पी.ओ. कडून कोर्टनाका मार्गे ठाणे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जी.पी.ओ. चौक येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. सदरची वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह कडून क्रिक नाका मार्गे दादोजी कोंडदेव स्टेडियम कडून उजवीकडे वळण घेवून ए-वन फर्निचर मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) कळवा व साकेत मार्गे ठाणे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उर्जिता हॉटेल येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. सदरची वाहने क्रिक नाका मार्गे डावीकडे वळण घेवून दादोजी कोंडदेव स्टेडियम कडून उजवीकडे वळण घेवून ए-वन फर्निचर मार्गे इच्छित स्थळी जातील.

३) ठाणे रेल्वे स्टेशन कडून टॉवर नाका / टेंभीनाका कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व मोठी वाहने तसेच रिक्षा व चार चाकी लहान वाहने यांना मुस चौक येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. ठाणे रेल्वे स्टेशन कडून सॅटिस ब्रिज वरून येणाऱ्या परिवहनच्या सर्व एस. टी. बसेस तसेच टी. एम. टी. च्या सर्व बसेस हया बी केबिन सॅटिस ब्रिज वरून गोखले रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच रिक्षा व चार चाकी लहान वाहने सॅटिस ब्रिज खालून स्टेशन रोड मुस चौक मार्गे डावीकडे वळण घेवून इच्छित स्थळी जातील.

 
Powered By Sangraha 9.0