रा. स्व. संघाची समन्वय बैठक पुण्यात, १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान आयोजन

    04-Sep-2023
Total Views |
Dr. Mohanji Bhagwat

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा महाराष्ट्रातील पुणे येथे होणार आहे. ही तीन दिवसीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे. गेल्या वर्षी ही बैठक छत्तीसगढमधील रायपूर येथे झाली होती.

समन्वय बैठकीस सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, पाच सह सरकार्यवाह संघाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ३६ संघप्रणित विविध संघटनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये प्रमुख संघटना राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय विद्यार्थी संघटना या बैठकीत सहभागी होतील.
 
बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव व कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. सामाजिक बदलाच्या विविध क्षेत्रातील कारक कृतींवरही चर्चा केली जाणार आहे.