आज जागतिक अनुवाद दिन. अनुवाद हे खरेतर अनुसर्जनाचे काम. वैविध्यपूर्ण जगाला एकसंध करणारा एक साहित्यप्रकार. त्यात अस्सलता नसली तरी नावीन्य आहेच. वाचणारासाठी अनुवाद खूप काही घेऊन येतो. त्यानिमित्ताने एक बौद्ध स्थविरी मुक्ता आणि काश्मिरी चालला या दोघींच्या काही रचनांचा घेतलेला मागोवा.
जेष्ठ लेखिका अरुण ढेरे यांनी भारतीय स्त्रीची कविता हा विषय घेऊन ज्या स्त्रियांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे वैराग्य पत्करलं, त्यांच्या रचनांचे अनुवाद त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'भारतीय विरागिणी' या पुस्तकात दिले आहेत.
बौद्ध स्थविरी मुक्ता म्हणते,
सुमुत्ता, साधुमत्ताम्हि,
तीहि खुज्जेहि मुत्तिया
उदुख्खलेन, मुसलेन, पतिना
खुज्जकेन च मुत्तम्हि जातिमरणा,
भवनेत्ति समूहता
मी मुक्त! छान मी मुक्त!
तीना खुज्यांपासून मुक्त मी
उखळ, मुसळ अन् कुबडा (नवरा)!
जनन-मरण फेऱ्यातुन झाले मुक्त!
भवतृष्णा झाली नष्ट!
मी मुक्त, मुक्त मी मुक्त
ही माया जगापासून मुक्त झालेली मुक्ता. धम्मदीक्षा घेऊन संसार सोडून दूर गेलेली ही स्त्री. तिच्या रचनांमधून अवर्णित आनंद दिसून येतो. तशीच एक लल्ला. लल्लेश्वरी ही काश्मिरी स्त्री. घरात फार हाल सहन केले. शेवटी घरातूनही बाहेर पडावे लागले. आणि ती विरक्त झाली. तिला संस्कृत ज्ञात होती. त्यावेळची प्रमाणभाषाच ती. पण लल्लाने सामान्य माणसांसाठी वाक लिहिले. वाक म्हणजे काश्मिरी रचना. अरुणाताईंनी त्यांचाही अनुवाद दिला आहे. त्यातून त्याकाळातील घर त्यागलॆल्या काश्मिरी स्त्रीच मन आपल्यासमोर उघड होतं.
हिवाळ्याच्या सुरुवातीच्या
थंडगार वाऱ्याने व्हावी जशी पानगळ,
तसा कुणी जाणता मी पाहिला,
भुकेने मरताना आणि पाहिलं कुणा मूखोला
आपल्या स्वयंपाक्याला मारझोड करताना
मी लल्ला तेव्हापासून वाट पाहतेय त्या क्षणाची
जेव्हा तुटतील माझी बंधनं या ऐहिकाची
ऐहिकापासून ती आत वळली. तिच्या गुरूचे शब्द आठवत स्वतःमध्ये खोल उतरली. काश्मिरी शैवागमाची साधना तिच्यात मुरली होती. ती म्हणाली,
गुरू म्हणाले एक मात्र आधी
जाणून घ्यायचे कसे आतमधून आणखी, आणखी आत जायचे
ते त्यांचे शब्द माझा नीतिपाठ बनले
आणि म्हणून मी लल्ला आता अशी मुक्त (नग्न) नाचले!
गुरूबद्दल तिची मतं वेगळी आहेत. ती एकवेळ देवाचा त्याग करेल पण गुरूला दुरावणार नाही. गुरु बद्दलची मते मांडताना ती लिहिती,
राम तजूं पै गुरू न विसारु
गुरूको सम हरिको न निहारु
चरणदासपर तन मन वारू
गुरू न तजूं, हरीको तज डारू
लल्लाही गुरूचा हात धरूनच प्रवास सुरू करते. ती एका वाक्मध्ये गुरूला म्हणते की त्या अनिर्वचनीयाचे नाव काय ते सांगा. अंतरात्म्याचे सत्यस्वरूप त्याने दाखवावे अशी त्या परमेश्वररूप गुरूला ती विनंती करते.
तिच्या रचनांमधून त्याकाळातील सामाजिक स्थितीवरही भाष्य करते. लल्ला भुकेने तळमळणाऱ्या जीवाबद्दल बोलते, बायका वापरतात ती स्वयंपाक घरातली परिभाषा वापरते, कधी थोडी हिंसेची भाषाही बोलते. हृदयातली मलीनता ती जाळते, वासनांना मारून टाकते.
उखळात कांडलं माझं प्रेम
वाईट विचार गेले निघून
गेले मी शांतवून!
मी जाळलं आणि भाजलं त्याला चाखलं
मग स्वतःच स्वतःला कसं समजणार
ही साधना जगवणार की मारणार मला?
कविता, कथा, कादंबरी व्यक्ती आपल्या अनुभव विश्वावर आधारित लिहीत असतो. एखाद्या विशिष्ट प्रभागातील साहित्यकृती, त्या त्या काळातील आर्थिक, सामाजिक आणि निसर्गविषयक अशा अनेक मुद्द्यांना हात घाला असतात. त्यांच्या अडचणी, तिथले नावीन्य, तिथल्या मातीतील लोकांचे विचार हे सर्व जगाच्या जवळ येतं ते अनुवादाच्या माध्यमातून. जागतिक अनुवाद दिनानिमित्त, आपणही आपल्याला इतर अवगत असलेल्या भाषांतील काही मजकुराचा अनुवाद आपल्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर करून अनुवाद दिन साजरा करू शकता.