रुग्णांना दिलासा - सिव्हील रुग्णालयात लवकरच १०० अतिरिक्त खाटांचा नवीन कक्ष
30-Sep-2023
Total Views |
ठाणे : कळवा रुग्णालयात मृत्युतांडव झाल्यानंतर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ठिकाणी तात्पुरत्या जागेत स्थलांतरित झालेले सिव्हील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांच्या सेवेसाठी सिव्हील रुग्णालयात आणखी १०० खाटांना मंजुरी दिली आहे. आता रुग्णालयात ३३६ खाटांची सोय असून खाटांचा नवीन कक्ष लवकरच उभारला जाणार आहे. या कक्षात काही वातानुकूलित आणि अतिदक्षता विभागासाठी खाटा राखीव असणार आहेत.
टेंभी नाका येथील सिव्हील रुग्णालयाच्या जागेत सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जात असून, रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. वागळे इस्टेट मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेत सिव्हील रुग्णालय तात्पुरते स्थलांतरित केले आहे. रुग्णालयाच्या बाह्य विभागात दररोज सुमारे ५०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
रुग्णांच्या सेवेसाठी जनरल विभागात ३३६ खाटांचा कक्ष बांधला असून, भविष्याचा विचार करून आरोग्य विभागाने आणखी १०० खाटाचा प्रस्ताव शासनाला दिला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असुन केंद्र सरकारच्या कोविड योजनेचा निधी आणि राज्य सरकारच्या मदतीने १०० खाटांचा कक्ष उभारला जाणार आहे. त्यामुळे खाटांची संख्या वाढणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.