नवी दिल्ली : छत्तीसगढ भ्रष्टाचार आणि कुशासनाने ग्रासलेला आहे. रोजगाराच्या नावाखाली केवळ घोटाळेच होत असून प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळेच छत्तीसगढच्या जनतेने यंदा परिवर्तन करण्याचे निश्चित केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिलासपूर येथे केले.
छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिलापूर येथे जाहिर सभेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारला मोदी आणि मोदींच्या दोन्ही योजना आवडत नाहीत. छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय गरीबांसाठी कायमस्वरूपी घरे पूर्ण करण्याचा असेल. काँग्रेस मोदींच्या नावाने मागासलेले, गरीब, आदिवासी यांना शिव्या देते. काँग्रेसला ओबीसींबद्दल द्वेष आहे. केंद्रात भाजपचे सरकार आले तेव्हा दलित समाजातून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले गेले. दुस-यांदा भाजपचे सरकार आल्यावर एका आदिवासी महिलेला उमेदवारी दिली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दिल्लीत जेव्हा काँग्रेसचे सरकार रिमोट कंट्रोलने चालत होते, तेव्हा छत्तीसगढला रेल्वेसाठी ३०० कोटी रुपये दिले होते. त्याचवेळी भाजप सरकारने मात्र रेल्वे विस्तारासाछी ६ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. छत्तीसगढच्या जनतेच्या विकासासाठी केवळ भाजप सरकारच कार्यरत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या कार्यकाळात मात्र छत्तीसगढ भ्रष्टाचार आणि कुशासनाने ग्रासलेला आहे. त्यामुळेच छत्तीसगढच्या जनतेने यंदा परिवर्तन करण्याचे निश्चित केले असून विधानसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आहे.
‘सर्वकाही सरकार करेल’ ही मानसिकता सोडा – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे संकल्प सप्ताह कार्यक्रमाला सुरुवात केली. यादरम्यान ते म्हणाले की, सर्व काही सरकार करेल या विचारातून आपल्याला बाहेर पडावे लागेल. कारण समाजाची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती असून त्यातून असाध्य ते साध्य करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, मुंबई आणि चेन्नईची भव्यता हेच भारताच्या विकासाचे प्रतीक नाही, तर भारतातील गावे समृद्ध करणे हे आमचे ध्येय असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.