मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक कोकणात गेले. कोकणात जाणाऱ्यांची पसंती कायमच कोकण रेल्वेला राहिली आहे. कोकणातील नियमित धावणाऱ्या ट्रेन्सची तिकिटे चार महिन्या अगोदरच आरक्षण खिडकी उघडताच काही मिनिटांमध्ये फुल झाल्यामुळे इतर प्रवाशांना गणेशोत्सवात कोकण रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांची तिकिटे मिळविण्याची चुरस लागली होती. यातच रत्नागिरी ते दादर पॅसेंजरला चाकरमान्यांची अधिक पसंती मिळाल्याचे दिसते आहे.
अवघ्या १५० रुपयांत रत्नागिरी ते दादर पॅसेंजरने तीन हजार चाकरमान्यांनी प्रवास केल्याची माहिती मिळते आहे. अहोरात्र चालविण्यात येणाऱ्या जादा गाड्यांमुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी येणे अतिशय सोयीस्कर झाले. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकर रेकॉर्ड ब्रेक संख्येनं कोकणात गेले होते. त्यामुळे जाताना आणि येताना दोन्ही वेळेला ट्रेन्स फुल्ल होत्या.