दै.‘मुंबई तरुण भारत’चा उपक्रम हा पंतप्रधानांच्या व्हिजनचा सन्मान : मंत्री मंगलप्रभात लोढा

30 Sep 2023 22:37:29
Mumbai Tarun Bharat Initiative Wealth Creators Programme

मुंबई :
दै.‘मुंबई तरुण भारत’कडून उद्योजकांचा झालेला सन्मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचा सन्मान आहे. असे गौरवोद्गागार राज्याचे उद्योजक व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले. निमित्त होते-उद्योजकांच्या गौरव सोहळ्याचे. शनिवार, दि. ३० सप्टेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ने ‘वेल्थ क्रिएटर्स’ हा कार्यक्रम उद्योजकांचा गौरव करण्यासाठी आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी उद्योजकांचे कौतुक करतानाच, त्यांना यशस्वी होण्याच्या क्लृप्त्या सांगितल्या.

या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, ‘भारतीय विचार दर्शन’चे अध्यक्ष सुश्रुत चितळे, उद्योग समुपदेशक अतुल गोरे यांच्या हस्ते ‘वेल्थ क्रिएटर्स’च्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सहप्रायोजक ‘चढ्ढा डेव्हलपर्स अ‍ॅण्ड प्रमोटर्स’च्यावतीने व्रिजेश मेहरा आवर्जून उपस्थित होते.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “बिकट परिस्थितीत जास्त डोक्याने विचार न करिता दिल की सोचो दिल कभी गलत नही होता,“ असा मूलमंत्र आगामी उद्योजकांना दिला. मंत्री लोढा म्हणाले की, “माझ्या अनुभवानुसार उद्योगांचे पहिले एक हजार दिवस फार महत्त्वाचे आहे. नफा का नुकसान, याचा विचार न करिता परिस्थितीचा सामना केल्यास टिकणे सोपे होईल. आधीच्या काळातील कोटा पद्धत गेली. त्यामुळे व्यवसायातील मोनोपोली राहिली नाही. त्यानंतर सरकारच्या धोरणांची उत्तम माहिती असलेल्यांना व्यवसाय वृद्धी शक्य झाली. त्यानंतर आताच्या काळात सगळी संसाधन सहज उपलब्ध आहेत,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपण व्यक्तिशः धीरूभाई अंबानी यांच्या दूरदृष्टीला महत्त्व देतो, असा आवर्जून उल्लेख केला.

अर्थव्यवस्थेतील ३० टक्के वाटा लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योजकांचा

उद्योग समुपदेशक अतुल गोरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना सध्याच्या उद्योग आणि उद्योजकांच्या परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, आजच्या घडीला देशाच्या अर्थव्यवस्थेतील ३० टक्के वाट लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांचा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान असताना अनेक आगामी उद्योजकांना मदतीची व समुपदेशनाची गरज आहे. उद्योजक होताना मंथन, कष्ट, वाचन या तीन बाबी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करतानाच उद्योजकांनी, यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. उद्योजकांच्या वाटचालीबद्दल बोलताना गोरे म्हणाले की, “ पुढील २५ वर्षे मायक्रो स्मॉल अ‍ॅण्ड मीडियम एंटरप्राईजेस अर्थात ‘एमएसएमई’ उद्योजकांची असून, हे उद्योजक देशाचा पाया आहेत. नोकर्‍यांचे प्रमाण घटत असताना उद्योग उभे केल्यास आमूलाग्र बदल होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अनावरण सोहळ्यात महाराष्ट्रातील शून्यातून वाढलेल्या व उद्योगाचे विश्व निर्माण केलेल्या उद्योजकांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांची दखल घेत उद्योजकांची निवड प्रकाशनाने केली होती. ‘हेक्सगॉन कंपनी’चे आदित्य केळकर, ‘एचडी फायर प्रोटेक्ट लिमिटेड’चे मिहीर घोटीकर, ‘विशाल असोसिएटस’चे विजय कडने, ‘फ्लो कंट्रोल पंप सिस्टिम’चे पार्थन पिल्लई, ‘जेट इलिवेटर’चे कैलाश जाधव, ‘श्री स्वामी समर्थ रेलिटेर’चे संजीव सावंत, सनग्रेस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे भालचंद्र साळवी, ‘केतन जोगळेकर असोसिस’चे केतन जोगळेकर, ‘ए टू झेड चे सिरपस’चे इनामुल्ला रहमानी, निहारिका फायब्रिक्स व निहारिका डिझाईन स्टुडिओचे यशवंत जैन, ‘दिव्य साई कॉकेम’चे संदीप खेडेकर या उद्योजकांना यावेळी पारितोषिके देण्यात आली.
 
Powered By Sangraha 9.0