'अवयवदान' हे देशभक्तीचेच कार्य! : सरसंघचालक

सुरतमध्ये ६३ अवयवदात्या कुटुंबांचा गौरवसोहळा

    29-Sep-2023
Total Views |
mohan bhagwat

मुंबई : "अवयवदान करणारे कुटुंब हे ईश्वरासमान आहे. अवयवदान करणे ही सुद्धा एकप्रकारे देशभक्तीचे कार्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर त्याच्या शरीराचा कोणाला उपयोग होत असेल तर तो नक्कीच झाला पाहिजे. सर्वांसाठी जगणे आणि सर्वांसाठी मरणे हेच खऱ्याअर्थाने मानवी जीवन आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सुरत येथे केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय इनडोअर स्टेडियममध्ये 'डोनेट लाइफ' संस्थेतर्फे आयोजित अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान अवयवदान करणाऱ्या एकूण ६३ कुटुंबांचा सरसंघचालकांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

अवयवदानाविषयी उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, "मनुष्याच्या मृत्यूनंतर शरीराचे काही अवयव जे जिवंत राहतात. ते अवयव इतर गरजवंतांसाठी उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे. हाच माणसाचा धर्म आहे. 'दधिची ऋषी' हे याचे परम आदर्श आहेत. ते पहिले अवयवदाते आहेत. त्यामुळे अवयवदान हे पवित्र कर्तव्य असून हीच खरी देशभक्ती आहे."
 
पुढे ते म्हणाले, "मातृभूमीचा सुपुत्र म्हणून एकमेकांशी जोडलेली आणि इतरांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणारी व्यक्ती म्हणजे 'मनुष्य'. मनुष्याला शारिरीक, बौद्धिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन समाजाच्या रूपाने भगवंताच्या चरणी चांगले दान देण्याची आवश्यकता आहे. असे झाले तर ज्याप्रमाणे संपूर्ण देशात स्वच्छतेच्या दृष्टीने सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे; त्याचप्रमाणे अवयवदानासारख्या उपक्रमातही सुरत नक्कीच अग्रेसर येईल, असा विश्वास आहे. अवयवदान हे एक उदात्त कार्य असून याच्या जनजागृतीसाठी संघ समाजासोबत आवर्जून काम करेल."

डोनेट लाइफचे अध्यक्ष नीलेशभाई मांडलेवाला म्हणाले की, "डोनेट लाइफ ब्रेन डेड व्यक्तींच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देऊन इतर रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य सध्या करत आहे. अजूनही भारतात ९४ टक्के लोकांना अवयवदानाबद्दल माहिती नाही. डोनेट लाईफ संस्थेने आजवर सुरत आणि देश-विदेशातील एकूण १०७७ लोकांना नवीन जीवन दिले आहे."

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.