नवी दिल्ली : पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांच्या अटकेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दि. २९ सप्टेंबर रोजी विधान केले. केजरीवाल म्हणाले की, मला कळले आहे की पंजाब पोलिसांनी काल एका काँग्रेस नेत्याला अटक केली आहे. त्याचे तपशील माझ्याकडे नाहीत. पंजाब पोलीस हे सांगतील. पण आम्ही ड्रग्जच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. मी कोणत्याही वैयक्तिक बाबी किंवा व्यक्तीवर भाष्य करू इच्छित नाही. पण अंमली पदार्थांचे व्यसन संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याविरुद्धच्या लढाईत लहान असो की मोठे कोणालाही सोडले जाणार नाही.
I.N.D.I.A युती आणि नितीश कुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबतच्या चर्चेवरही केजरीवाल यांनी विधान केले. केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी I.N.D.I.A युतीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही युतीपासून फारकत घेणार नाही. विरोधी आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप तयार नसल्याबाबत त्यांनी थोडा वेळ द्यावा, असे सांगितले.
नितीश कुमार यांना पीएम चेहरा बनवण्याच्या चर्चेवर अरविंद केजरीवाल म्हणाले - आमची एकच भूमिका आहे की आम्हाला अशी व्यवस्था निर्माण करायची आहे की या देशातील १४० कोटी जनतेतील प्रत्येक व्यक्तीला आपण पंतप्रधान आहोत असे वाटेल. आपण लोकांना सक्षम बनवायचे आहे. आम्ही कोणत्याही एका व्यक्तीला सक्षम बनवू इच्छित नाही.