नरेंद्र मोदी : राजनेता आणि राष्ट्रनेत्याचा दुर्मीळ संगम

29 Sep 2023 21:34:22
Article On PM Narendra Modi Political Understading

महाराष्ट्रात एक विश्वगुरू पंडित आहेत, त्यांनी भविष्यवाणी केली की, २०२४ साली मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. ‘इंडिया’ गटबंधनातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची हीच भविष्यवाणी आहे. आपल्या सारखी सामान्य माणसे भविष्यवेत्ती नसतात. आपण वर्तमानात जगतो म्हणून वर्तमान काय आहे, याचा जरा विचार करूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल दोन टोकाची मते मांडली जातात. एक मत असे आहे की, ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ आणि दुसरे मत असे आहे की, ‘मोदी हैं तो सत्यानाश हैं.’ दुसर्‍या प्रकारे सांगायचे, तर नरेंद्र मोदी यांचा पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते हे मोदीभक्त आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करायचे, तर पक्षाच्या सर्वोच्च नेत्याविषयी भक्तिभाव ठेवावा लागतो आणि तो भाषणातून प्रगटही करावा लागतो. काही भक्त हे जागरूक असतात आणि काही भक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात. पक्षाची वैचारिक निष्ठा जोपासणार्‍यांचा एक गट असतो आणि दुसरा गट राजकीय संधीसाधूंचा आणि राजकीय स्वार्थाचा विचार करणार्‍यांचा असतो.

‘मोदी हैं तो सत्यानाश’ म्हणणारा एक वर्ग आहे, ती त्यांची राजकीय मजबुरी आहे. मोदी आल्यामुळे ज्यांचे सत्तेवर येण्याचे दरवाजे बंद झाले आहेत, पैसा मिळवण्याचे मार्ग आटले आहेत, सत्ता मिळवण्याची इच्छा अतृप्त राहिली आहे, ते ‘मोदी हैं तो सत्यानाश‘ याशिवाय दुसरे काय म्हणणार? महाराष्ट्रात एक विश्वगुरू पंडित आहेत, त्यांनी भविष्यवाणी केली की, २०२४ साली मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. ‘इंडिया’ गटबंधनातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांची हीच भविष्यवाणी आहे. आपल्या सारखी सामान्य माणसे भविष्यवेत्ती नसतात. आपण वर्तमानात जगतो म्हणून वर्तमान काय आहे, याचा जरा विचार करूया.

वर्तमान हे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जसे राजनेता आहेत तसे राष्ट्राला घडविणारे नेता आहेत. राजनेता राज्याचे नेतृत्व करतो. राष्ट्रनेता राष्ट्राचे नेतृत्व करतो. भारत एक राज्य (स्टेट) आहे. राज्याचे विषय जनविकास, कायदा-सुव्यवस्था, सीमारक्षण, परराष्ट्र धोरण, आरोग्य, महिला विकास, बालकल्याण, दळणवळणांच्या साधनांचा विकास, शिक्षण विकास, लोकशाही संस्थांचा विकास असे वेगवेगळे असतात. राजनेत्याला हे सर्व विषय कौशल्याने आणि कार्यक्षमतेने करावे लागतात. सर्व राजनेत्यांकडे अशी क्षमता असतेच असे नाही. ते जेव्हा सत्तेवर येतात, तेव्हा यातील अर्ध्याहून अधिक विषयांचा बट्ट्याबोळ होतो. बिहारचे लालूप्रसाद यादव, नितीश कुमार अणि उबाठाचे उद्धव ठाकरे याची उत्तम उदाहरणे आहेत. उद्या चुकून राहुल गांधी देशाच्या सर्वोच्चपदी बसले, तर राज्य चालविण्याच्या अकार्यक्षमतेचे ते आदर्श उदाहरण ठरतील.

नरेंद्र मोदी हे कुशल राज्यनेता आहेत. वर दिलेल्या राज्यांच्या विषयातील त्यांचे कार्य केवळ कागदावरील कार्य नसून, वर्तमानकाळात ते आपण पाहू शकू. महिलांना ३३ टक्के आरक्षण त्यांनी संसदेत संमत करून घेतले. कोरोना काळात सर्व भारतीयांना प्रतिबंधक लस देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या काळातील रस्तेबांधणीचा विकास, रेल्वे गाड्यांचा विकास आपण बघू शकतो. कौशल्य विकासाचे त्यांचे प्रकल्प हा वर्तमानकाळातील अनुभूतीचा विषय आहे. ‘प्रत्येक घरी शौचालय’ हा त्यांचा प्रकल्प वर्तमानात आपण पाहू शकतो. गरिबी रेषेखाली राहणार्‍यांना विनामूल्य धान्य त्यांनी कोरोना काळात दिले, हादेखील अनुभवण्याचा विषय आहे. ‘जी २०’ परिषदेमध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे घोषणापत्र त्यांनी एकमताने संमत करून घेतले. ‘चांद्रयान ३’ मोहीम यशस्वी झाल्याचे आपण नुकतेच पाहिले. राज्य चालविणारा एक सक्षम नेता, अशी नरेंद्र मोदी यांची आज प्रतिमा आहे. ही प्रतिमा अनेकांच्या डोळ्यात खुपते. या डोळेदुखीला आपल्याकडे काही उपाय नाही.

परंतु, नरेंद्र मोदी हे केवळ राजनेता नाहीत, ते राष्ट्रनेता आहेत. राज्य आपल्या विविध उपक्रमांतून राष्ट्र बळकट करण्याचे कार्य करीत असते, त्यासाठी राजकीय नेत्याला आपले राष्ट्र म्हणजे काय, याची केवळ माहितीच नव्हे, तर ज्ञान असावे लागते. ज्या महापंडितांनी १९४७ साली भारत राष्ट्राचा जन्म झाला, असा शोध लावला, त्यांच्या अफाट बुद्धीला आपण प्रणाम करूया. भारत एक सनातन राष्ट्र आहे आणि त्याचे वय सुमारे दहा हजार वर्षे आहे. १९४७ साली ज्यांनी शोध लावला, ते म्हणतात की, ‘इंडिया दॅट इज भारत’ आणि ‘दहा हजार वर्षांचा भारत’ ही संकल्पना जे जगतात, ते म्हणतात की, ‘ही जननी जन्मभूमी आहे आणि ती स्वर्गाहून महान आहे.’ हे राष्ट्राचे मूलभूत ज्ञान राज्यनायकाला असावे लागते आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे ते १०१ टक्के आहे.’

आमचे हे सनातन राष्ट्र आहे म्हणजे काय आहे? राष्ट्रनायक नरेंद्र मोदी आपल्या कृतीतून ते व्यक्त करतात, ही देवभूमी आहे. केदारनाथच्या गुहेत बसून ते ध्यानधारणा करतात, काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतात, बनारसच्या गंगा घाटावर जाऊन गंगेची आरती करतात, अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करतात, दक्षिणेत रामानुजम यांच्या पुतळ्याचे अनावरण करतात. सनातन राष्ट्राची ही परंपरा आहे, सनातन राष्ट्राची ही जीवनमूल्ये आहेत. हा वर्तमान आपण सर्वांनी बघितला आहे.

ही जशी देवभूमी आहे, तशी दुर्गाशक्ती भूमी आहे. आपले तत्त्वज्ञान हे सांगते की, ब्रह्मांडाची निर्मिती शिव आणि शक्ती यांच्या संयोगाने होते, ही दोन तत्त्वे आहेत. शक्ती ही नारीरुपा असते. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची शक्ती ही खर्‍या अर्थाने नारी शक्ती आहे, हे जाणले. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या विविध योजना आणि स्त्रीला सन्मान देण्यासाठी त्यांनी आखलेल्या अनेक योजना हा राष्ट्र बांधणीचा मार्ग आहे, हा वर्तमान आहे आणि तो आपण जगतो आहोत.

स्वामी विवेकानंद सांगून गेले की, “प्रत्येक राष्ट्राचे एक जीवनलक्ष्य असते, त्या जीवनलक्ष्याच्या पूर्तीसाठी राष्ट्र जगत असते. राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील राष्ट्रीय लोकसंख्येत सांगायचे, तर १३० कोटी लोक आपण राष्ट्र म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी जगत नाही. आपले लक्ष विश्वकल्याणाचे आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा आपला जीवनमंत्र आहे. राष्ट्रनायक मोदी तो कसा जगतात, जगातील गरीब देशांना राष्ट्रनायक मोदी यांनी कोरोना काळात कोट्यवधी रुपयांची औषध दिली, अन्नधान्याची टंचाई असणार्‍या देशांना अन्नधान्य पाठविले, जगामध्ये दोन देशांमध्ये वादविवाद चालू असता राष्ट्रनायक मोदी कोणाचीही बाजू न घेता विश्वकल्याणासाठी युद्ध टाळले पाहिजे, पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, हे सांगतात. भारतीय राष्ट्राच्या जीवनध्येयाचे ते प्रगटीकरण करतात.

एका भूभागावर राहणार्‍या जनसमूहाचे राष्ट्र, एका संस्कृतीने घडते. या संस्कृतीचा निर्माता कोणी एखादी व्यक्ती नसते. अनादी कालापासून संस्कृतीचा प्रवाह गंगेसारखा वाहत असे. राष्ट्राची प्रत्येक पिढी त्यामध्ये भर घालीत जाते. राष्ट्रीय ऐक्याची नवनवीन प्रतीके निर्माण करावी लागतात. राष्ट्रनायक नरेंद्र मोदी यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, नवीन संसद भवन, राजपथाचे नाव बदलून ‘कर्तव्यपथ,’ असे केले. तेथे जवानांचे स्मारक उभे करणे, दि. २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करणे, अशी अनेक नवीन प्रतीके राष्ट्रनायक मोदी यांनी निर्माण केली आहेत. ‘इंडिया’वाल्यांची प्रतीके ताजमहल, कुतुबमिनार, गेट वे ऑफ इंडिया, औरंगजेबाची कबर अशी आहेत. ही भारतीय राष्ट्राची प्रतीके नव्हेत. परंपरेला नावीन्याची जोड द्यावी लागते. राष्ट्रनायक नरेंद्र मोदी यांनी हे काम उत्तम प्रकारे केले आहे.

राष्ट्रसंवर्धनासाठी सर्व राष्ट्राला अभिमान वाटेल, अशी समूह कृती व्हावी लागते. ‘इस्रो’ची ‘चांद्रयान’ मोहीम ही अशी समूह कृती आहे. पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवरील हल्ले ही समूह कृती आहे. चीनला सीमेवर त्याच्याच भाषेत उत्तर देणे, ही राष्ट्रीय पराक्रमाची कृती आहे. जागतिक क्रीडा स्पर्धा पदके मिळविणे, हीदेखील राष्ट्रभावना संवर्धन कृती आहे. राष्ट्रनेताच अशा प्रकारची कामे करू शकतो. त्यासाठी दृष्टी लागते, निर्धार लागतो आणि निर्णयक्षमता लागते. राजनेता आणि राष्ट्रनेता यांच्या गुणांचा दुर्मीळ संगम म्हणजे नरेंद्र मोदी!

९८६९२०६१०१

Powered By Sangraha 9.0