सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 'अंकुश' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच
27-Sep-2023
Total Views |
मुंबई : बीडचे सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे लाँच करण्यात आला. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.
ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले 'अंकुश' या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे. सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाला समोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार ‘अंकुश’ या चित्रपटात आहे. म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतला दमदार अॅक्शनपट म्हणून ‘अंकुश’ या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे. चित्रपटात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले. सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे,शशांक शेंडे,गौरव मोरे, नागेश भोसले ,पूजा नायक अशी दमदार कलाकारांची फौज आहे.