कळवा रुग्णालय प्रकरण : समितीकडून अहवाल अखेर शासनाला सादर; त्रुटींकडे वेधले लक्ष

27 Sep 2023 19:56:18
Kalwa Hospital Case Committee Reports Revealed To Government

ठाणे :
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ ऑगस्ट रोजी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने अखेर आपला अहवाल गेल्या आठवड्यात शुक्रवारी शासनाला सादर केला आहे. या अहवालात कोणावरही ठपका ठेवला नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे चौकशी समितीच्या चौकशीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ जणांची चौकशी समिती नेमली होती. ही घटना घडल्यानंतर १५ दिवसांनी चौकशी समिती आपला अहवाल सादर करेल असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र हा अहवाल सादर करण्यास चौकशी समितीला बराच विलंब लागला. या प्रकरणाची चौकशी करत असताना रुग्णालयातील महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यापासून ते डॉक्टर्स, नर्स, मृतांचे नातेवाईक, अशा सर्वांचे जबाब समितीच्या वतीने नोंदवण्यात आले. दोन वेळा मुदत उलटूनही समितीने अहवाल सादर केला नव्हता.

अखेर गेल्या आठवड्यात शुक्रवारी चौकशी समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. बराच काळ चौकशी सुरु असल्याने कोणावर तरी कारवाई होईल अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहींच झाले नसून या अहवालात सध्या तरी कोणावर दोषारोप ठेवण्यात आला नसल्याचे समजते.

रुग्णालयातील त्रुटींकडे वेधले लक्ष...

चौकशी अहवालात कोणावर ठपका ठेवण्यात आला नसला तरी रुग्णालयांच्या त्रुटींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रुग्णालायाबाबत नेमक्या काय सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत याबाबत कोणी बोलायला तयार नाही. चौकशी समितीने सुचवलेल्या सुधारणांबाबत तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी होणार का ? याबाबतही साशंकता आहे.

Powered By Sangraha 9.0