जेएनयूमध्ये डाव्यांना संघाची भीती; 'द आरएसएस, मनू अँड आय' कार्यक्रमाचे फाडले पोस्टर्स!

27 Sep 2023 16:51:48
JNU news

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित 'द आरएसएस, मनू अँड आय' या कार्यक्रमाचा धसका घेऊन पोस्टर्स डाव्या विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमाचे पोस्टर्स फाडण्याचा नेहेमीचा बालिशपणा केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघाचे) ज्येष्ठ विचारक आणि समरसता मंचाचे संस्थापक सदस्य रमेश पतंगे लिखित ‘मी, मनू आणि संघ’ या पुस्तकाच्या ‘द आरएसएस, मनू अँड आय’ या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन जेएनयूमधील वाल्मिकी स्टडी सर्कल, साप्ताहिक विवेक आणि विवेक प्रकाशनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारक रमेश पतंगे यांच्यासोबत पत्रकार नुपूर शर्मा आणि सेंटर फॉर कम्पॅरिटीव्ह पॉलिटिक्स अँड पॉलिटीकल थियरीचे प्राध्यापक प्रा. रवि शुक्ला हे रमेश पतंगे यांच्याशी संवाद साधला.

मात्र, कार्यक्रमापूर्वीच रा. स्व. संघाचा धसका डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी घेतल्याचे दिसून आले. जेएनयूमध्ये साप्ताहिक विवेकतर्फे आयोजित कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला होता. या कार्यक्रमाद्वारे रा. स्व. संघाविषयी डाव्या कंपूने पसरविलेल्या अफवांचे सत्य बाहेर येईल, यामुळे भेदरलेल्या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमास विरोध करण्यास प्रारंभ केला. यावेळी 'दिशा' नामक जेएनयूबाहेरील डाव्या विचारांच्या संघटनेने साप्ताहिक विवेकतर्फे आयोजित कार्यक्रमाचे पोस्टर फाडण्याचा बालिश प्रकार केल्याचे उघडकीस आले.

विचारांचा हिंसक विरोध ही आपली परंपरा नाही - रमेश पतंगे

कोणत्याही कार्यक्रमाचे अशाप्रकारे पोस्टर्स फाडणे हे योग्य नाही. लोकशाहीमध्ये विचारांचे अतिशय मोठे महत्व आहे, वैचारिक वाद-चर्चा हे लोकशाहीचे महत्वाचे मूल्य आहे. विद्यापीठे हे तर खुल्या चर्चेसाठी ओळखले जातात. विद्यापीठ आवारात खुल्या वातावरणात प्रत्येक विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे.

लोकशाहीविरोध हेच डाव्यांचे वैशिष्ट्य - शांभवी थिटे, पीएचडी विद्यार्थी- जेएनयू

वाल्मिकी स्टडी सर्कलतर्फे आयोजित कार्यक्रमाचे पोस्टर्स आम्ही संपूर्ण विद्यापीठ आणि वसतीगृहांमध्ये लावले होते. मात्र, 'दिशा' या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेने २६ रोजी रात्रीच या कार्यक्रमाचे पोस्टर्स फाडून टाकले, अनेक ठिकाणी आमच्या कार्यक्रमाच्या पोस्टर्सवर दुसरे पोस्टर्स लावण्याचे प्रकार झाले. त्यामुळे एरवी लोकशाही, खुली चर्चा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे महत्व सांगणारे डावे प्रत्यक्षात मात्र लोकशाहीविरोधी आहेत.



 
Powered By Sangraha 9.0