मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार अर्थात 'दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना जाहिर करण्यात आला आहे. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार वहिदा यांना जाहिर झाल्याची माहिती केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात असून हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे प्रदान केला जातो. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पहिल्या मानकरी अभिनेत्री देविका राणी या होत्या. १९३३ साली 'कर्मा' या चित्रपटातून आपली अभिनय कारकिर्द सुरु करणाऱ्या देविका राणी यांना भारतीय चित्रपटाची फर्स्ट लेडी म्हणून ओळखले जाते. याशिवाय सुलोचना, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे अशा अनेक मान्यवरांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
वहिदा रेहमान यांची कारकिर्द
वहिदा रेहमान यांचा जन्म तामिळनाडूतल्या चेंगलपेट गावात १९३८ मध्ये झाला. वहिदा यांनी अभिनयाची कारकीर्द तामीळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतून सुरु केली होती. मात्र त्यांना प्रसिद्धी १९५६ साली प्रदर्शित झालेल्या 'सीआयीडी' या चित्रपटातून मिळाली आणि हा चित्रपट त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी 'अदालत', 'कभी कभी', 'कागज़ के फूल', 'काला बाज़ार', 'कूली', 'गाईड', 'घुँघरू', 'चाँदनी', 'नमक हलाल', 'नमकीन', 'नीलकमल', 'पथ्थर के सनम' अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.