नांदेड : राष्ट्रीय तपास यंत्रणा, एनआयएने देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या ४३ गुन्हेगारांची नावे आणि त्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे अशी कोणतीही व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाकडे देण्याचे आवाहन नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
याबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, कोणताही संशयित मनुष्य दिसला तर पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती द्यावी. तसेच लॉज आणि हॉटेल चालकांनी प्रत्येक व्यक्तीचा वैध पुरावा पाहिल्याशिवाय त्याला आश्रय देऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
एनआयएने दहशतवादी गुंडांच्या नेटवर्कवर कारवाई सुरू केली आहे. अशा गुन्हेगारांची नावे आणि फोटोही प्रसिद्ध केले आहेत. एनआयएने प्रसिद्ध केलेल्या यादीत जे देशातून पळून गेले आहेत आणि ज्यांच्यावर खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे अशा काही मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांचा समावेश आहे. या यादीतील दहशतवादी नांदेड शहरात येण्याची शक्यता असल्याने नांदेड पोलीस अलर्ट मोडवर आहेत. याआधीही नांदेडमध्ये अनेक दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे. त्यामुळेच येथील पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.