हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाची पुनर्बांधणी

प्रशासनासोबतच नागरिकांच्या सहभागासाठी कमिटी स्थापण्याचे मंत्री लोढांचे निर्देश

    26-Sep-2023
Total Views |
Mangalprabhat Lodha news
 
मुंबई : मलबार हिल येथील १३६ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा मुंबई महापालिकेतर्फे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनातर्फे महत्वाचे निर्णय घेत असताना नागरिकांचा देखील त्यामध्ये सहभाग असावा, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असावा या उद्देशाने कॅबिनेट मंत्री व स्थानिक आमदार लोढा यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांच्या मागण्या या दोन्ही लक्षात घेऊन सुवर्ण मध्य काढण्यासाठी आजची बैठक अतिशय महत्वाची होती. या बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त पी. वेळारुसु, अभनेत्री जुही चावला, मुंबई महापालिकेचे इतर अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये नागरिकांच्या समस्या समजून घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री लोढा यांनी प्रशासनासह काम करण्यासाठी नागरिकांची एक कमिटी स्थापन करण्याविषयी निर्देश दिले, जेणेकरून नागरिक सुद्धा या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. प्रशासनात पारदर्शकता असावी, यादृष्टीने नागरिकांचा सहभाग अतिशय आवश्यक असल्याने या कमिटीची भूमिका अतिशय महत्वाची ठरेल. या बैठकी दरम्यान कॅबिनेट मंत्री लोढा यांनी नागरिकांच्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेल्या असल्याचे सांगितले तसेच त्या सोडवण्यासाठी एक सुवर्णमध्य काढू असे आश्वासन दिले आहे.

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले "या जलाशयासाठी दुसरी जागा शोधण्याबाबत मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो आहे. त्या अनुषंगाने काही महत्वाच्या जागा सुद्धा आमच्या नजरेत आहेत. नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरु असून, नक्कीच त्यातून जनहिताचा तोडगा निघेल. या बाबतची पुढील कार्यवाही करताना नागरिकांचा त्यामधील सहभाग सुद्धा अतिशय महत्वाचा ठरेल, जेणेकरून सर्व निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राहील!"