रसिका शिंदे-पॅाल
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि लेखक परेश मोकाशी लिखीत ‘आत्मपॅम्फलेट’ चित्रपट ६ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात जगाचा इतिहास बदलणारं आतामचरित्र सांगण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे ‘बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट’ महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात 'आत्मपॅम्फ्लेट'चा वर्ल्ड प्रीमिअर झाला तर आशिया पॅसिफिक स्क्रिन अवॉर्ड्स आस्ट्रेलियामध्ये सत्तर देशांतील चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांना मिळणारा मान सन्मान महाराष्ट्रात देखील तितकाच प्रेक्षकांकडून मिळतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना परेश मोकाशी म्हणाले, “आपल्याकडे प्रेक्षक तयार आहेत. ज्या प्रकारचे चित्रपट आपण करत आहोत ते उल्लेखनीय आहेत. मात्र, महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच पुरोगामी, पुढचा विचार करणारा आणि सर्वांना सामावून घेणारा प्रांत असल्यामुळे आपल्याकडे हिंदी चित्रपटांनाही तेवढं मोठं स्थान आहे. मराठी प्रेक्षक फार पुर्वीपासून हिंदी, इंग्रजी अथवा अन्य भाषांच्या चित्रपटांचा भोगता राहिला आहे. त्यामुळे थोडं फार विभाजन झाल्यामुळे मराठी प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे अशी शंका येते पण अलीकडच्या काळात मराठी चित्रपट जे व्यावसायिक दृष्ट्या गाजले आणि ते पाहता ही शंका दुर होते”.
अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले असून परेश मोकाशी यांनी 'आत्मपॅम्फ्लेट'चे लेखन केले आहे. डार्क कॉमेडी असणाऱ्या या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय, कनुप्रिया ए. अय्यर मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत. महाराष्ट्रभरात हा चित्रपट ६ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.