गिरगावातील केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली भेट

26 Sep 2023 15:19:25

j.p. nadda


मुंबई :
गिरगावातील केशवजी नाईक चाळीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे १३१ वे वर्ष आहे. याठिकाणी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबईतील सर्वात पहिला गणेश उत्सव साजरा करण्यात आला. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्यांच्या ऐतिहासिक गणेश उत्सव दौऱ्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले होते. या भेटीदरम्यान नड्डा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर केशवजी नाईक चाळ येथील गणपतीचे दर्शन घेतले. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कौशल्य , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते.



j.p. nadda ganpati darshan


या प्रसंगी मराठमोळ्या पद्धतीने जे पी नड्डा यांचे स्वागत करण्यात आले. स्थानिकांना अभिवादन करून नड्डा यांनी उपस्थित मान्यवरांसह गणपतीचे दर्शन घेतले आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती विविध कार्यक्रमातून सादर करण्यात आली. जे. पी. नड्डा यांनी अतिशय आनंदाने या परंपरेचा अनुभव घेतला आणि उत्सुकतेने त्याचे महत्व जाणून घेतले. यावेळी दहीहंडी पथकाने दिलेली मानवंदना हे विशेष आकर्षण ठरले.

भारतीय समाजामध्ये एकी निर्माण व्हावी, जनजागृती व्हावी, सर्वांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यातूनच केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती आणि आजचा काळ यामध्ये प्रचंड फरक असला तरी राष्ट्रासाठी एकत्र येणे, देशप्रेमाची भावना सतत जागरूक ठेवणे हे आजही तितकेच महत्वाचे आहे. केशवजी नाईक चाळीत अनेक प्रख्यात लोकांची निवासस्थाने होती, अनेक नावाजलेली व्यक्तिमत्व या चाळीस भेट देऊन गेली आहेत आणि अनेकांनी टिळकांच्या प्रेरणेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य केले आहे. या सर्वच दृष्टीने जे पी नड्डा यांनी केशवजी नाईक चाळीला दिलेली भेट महत्वाची ठरते.

ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!



Powered By Sangraha 9.0