भारतात जवळपास वर्षभर काहीना काही उत्सव-सोहळे यांची धूम असतेच. त्यामुळे परदेशी लोक भारताला ‘उत्सवांचा देश’ म्हणूनही संबोधतात. पावसाळ्याच्या मध्यापासून पीकपाणी उत्तम होत असताना उत्सवांची रेलचेल सुरू होते. त्यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी या महाउत्सवांचा विशेष उल्लेख करता येईल. या महाउत्सवांना काही वर्षांपूर्वी सार्वजनिक तसेच व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले. त्यामुळे या उत्सवांना अतिउत्साहाचे ग्रहण लागले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. उत्सव आणि महाउत्सवांमध्ये राजकीय नेत्यांचे वाढदिवस ते सभा-समारंभ आणि मेळावे यांचाही हल्ली समावेश झालेला दिसतो. यादरम्यान हजारोंच्या संख्येने उत्साही मंडळी एकत्र येतात आणि काहीवेळा ते आपल्या मर्यादा सोडून अतिउत्साहात इतरांना त्रास होईल, असेच त्यांचे वर्तन चिंतेचा विषय ठरतो. गणेशोत्सवाच्या आठवडाभर आधी डोंबिवलीत एका ज्येष्ठ नागरिकाने वर्गणी देण्यास नकार देताच, त्याला धक्काबुक्की करण्याचा प्रकार मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तसेच त्या व्यक्तीवर अवमानजनक टिप्पणीही केली गेली. त्यामुळे निराश झालेल्या त्या व्यक्तीने पोलीस ठाणे गाठले. तेथेही मंडळाचे पदाधिकारी पोहोचले आणि त्या वृद्धाला दमदाटी करून तक्रार न करण्यास भाग पाडले. मात्र, या संदर्भातील व्हिडिओ ‘व्हायरल’ झालाच. असाच प्रकार अनेक मंडळांच्या बाबतीत होत असतो. मंडळाचे कार्यकर्ते भक्तांच्या भावनांशी खेळतात. त्यांना धक्काबुक्की करतात आणि त्यामुळे उत्साहाला गालबोट लागत असते, हे तर आता दरवर्षीचे निराशाजनक चित्र. अनेकदा सर्वसामान्यांना त्रास होईल, असे वर्तन अतिउत्साही मंडळी करताना दिसतात. यात पर्यावरणाचा र्हास करणे, गोंधळ घालणे, धिंगाणा आवाजाची मर्यादा ओलांडून नाचगाणे करणे. वास्तविक कोणत्याही धार्मिक उत्सवात या गोष्टी नको असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मानसिक त्रास होत असतो. त्यांचा विचार न करता, ही अतिउत्साही मंडळी उत्सवावर अतिउत्साहाच्या भरात विरजण टाकण्याचेच काम करत असतात. सण-उत्सव परस्परांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी असतात. पण, याच उत्सवांत लोकांशी संबंध खराब करून, शत्रुत्व निर्माण करून घेण्याइतपत ओसंडून वाहणारा अतिउत्साह हा घातकच म्हणावा लागेल.
एखाद्या सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमात निष्काळजीपणामुळे अनेकदा निष्पापांचे बळी जातात. व्यवस्थित काळजी घेतली तर हे जीव नक्कीच वाचू शकतात. मात्र, ज्यांच्या कृतीतच मुळी निष्काळजीपणा आहे, त्यांच्याकडून काळजीपूर्वक कृतीची अपेक्षा करणे गैर ठरावे. गणेशोत्सव असो अथवा अन्य कोणताही सण-उत्सव, त्यात बरेचदा आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा अनेकांचे जीव गेले आहेत. यात प्रसादातून विषबाधा, विसर्जन मिरवणुकीत होणारे गैरप्रकार किंवा अतिउत्साहाच्या भरात खोल पाण्यात जाऊन विसर्जन करणे, मिरवणुकीदरम्यान नको ते धाडस करणे, त्याशिवाय गोपाळकाला उत्सवात अशाच प्रकरामुळे काहींचे जीव गेले आहेत, तर काही तरुण कायमचे जायबंदी झाले आहेत. अशांचे ओझे त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्यभर पेलावे लागत असते.यंदाच्या गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच विजेचा धक्का लागल्याने चौघा गणेशभक्तांचा मृत्यू झाला, तर दीड दिवसांच्या गणपती विसर्जनात दोघे बुडाले. या घटना ताज्या आहेत. दरवर्षी गणपती विसर्जन काळात या घटना घडतातच. पण, यासाठी इतरांना जबाबदार धरण्याआधी आपण किती काळजी घेतली, हेही पाहणे महत्त्वाचे. समुद्र किनार्यांवर जीवरक्षक असतात. अनेक ठिकाणी मोठमोठे फलक लावलेले असतात. त्या सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणार्यांना याचा फटका बसतो. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरसारख्या समुद्रकिनारी पर्यटक अथवा गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षीच्या. त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न येणे, खोल समुद्रात जाण्याचे नको ते धाडस करणे, अतिआत्मविश्वास या प्रकारांमुळे या दुर्घटना घडत असतात. योग्य ती खबरदारी घेतल्यास अशा घटना नक्कीच टाळता येतील. केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर नाताळ, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या धुंदातही तरुणांकडून असेच नको ते धाडस केले जाते आणि त्याची परिणती दुर्घटनांमध्ये होते. सण-उत्सव सर्वच धर्मांत साजरे केले जातात. त्यातही प्रत्येकाने स्वत:सह इतरांची आणि पर्यावरणाची योग्य ती काळजी घेतल्यास, निष्काळजीपणाचे बळी जाणार नाहीत. सण-उत्सव साजरे करताना आपल्या, आपल्या कुटुंबीयांच्या आणि समाजाच्या आनंदात विरजण पडणार नाही, याची खबरदारी घेण्याची बाप्पा सद्बुद्धी देवो, हीच मनोकामना...
-मदन बजगुजर