नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर आता आणखी एका मोठ्या महामारीचा सामना आपल्याला भविष्यात करावा लागणार आहे. २०२० मध्ये संपुर्ण जगावर कोरोनाचा संकट पसरलं होतं. त्या कोरोना महामारीमुळे जगात जवळपास २५ लाख जण मृत्यूमुखी पडले. पण आता कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू डोकं वर काढतोयं. युनायटेड किंग्डमच्या वैद्यकीय तज्ज्ञानं असा दावा केला आहे की, 'डिझीज एक्स' ही महामारी कोरोनापेक्षाही भयंकर असणार आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, कोविड-१९ नंतर आणखी एका नवीन महामारीचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्याबाबत आतापासूनच प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. एवढेच नाही तर आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की या नवीन महामारीमुळे ५० दशलक्ष (पाच कोटी) पेक्षा जास्त लोक बाधित होऊ शकतात, हे निश्चितपणे आरोग्यासाठी मोठा धोका असू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महामारी कोविड-१९ पेक्षा सातपट अधिक गंभीर आणि प्राणघातक असू शकते, परिणामी भविष्यात आरोग्य विभागावर मोठा दबाव येण्याचा धोका आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अर्थातच, प्रत्येकाला या आजाराचा धोका आहे असे मानले जाऊ शकत नाही, परंतु जागतिक स्तरावरील मोठ्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो.