भारताला पहिले गोल्ड जिंकून देणारा मराठमोळा नेमबाज रुद्रांक्ष पाटील कोण? जाणून घ्या

25 Sep 2023 21:43:09
Rudranksh Patil,

मुंबई : महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने (Rudraksh Patil) याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरूवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करीत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. रुद्रांक्ष पाटील हा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याने नेमबाजीचा वर्ल्ड कप जिंकलाय.

दहा मीटर एअर रायफल्स संघातील रुद्रांक्ष पाटील याने 632.5 अशी गुणांची कमाई केली. मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शानदार कामगिरी केली. पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाटील हा अभिनव बिंद्रानंतर दुसरा भारतीय ठरला होता. गेल्यावर्षी ईजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट कपच्या (President cup) 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत याने सुवर्ण पदक जिंकत महाराष्ट्रासह भारताचं नाव मोठं केलं होते. त्याशिवाय सुवर्णपदकार नाव कोरल्यानंतर 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के केले होते.


India bag first gold medal; Rudranksh Patil, Aishwary Tomar and Divyansh Panwar shine 

रुद्रांक्षला कुटुंबाची साथ
 
देशात एकीकडे सर्वांना क्रिकेटनं वेड लावलं असताना रुद्रांक्षने वेगळ्या वाटेने जात रायफल शूटींगमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दरम्यान या सर्वामध्ये रुद्रांक्षच्या परिवाराने त्याला खूप पाठिंबा दिला. रुद्रांक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. आई हेमांगिनी पाटील या परिवहन विभागात नवी मुंबई वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. रुद्रांक्षला कुटुंबाने साथ दिल्यामुळेच त्याने यशाचे शिखर गाठले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरूवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे. यासाठी या खेळाडुंचे, त्यांच्या प्रशिक्षक-मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबियांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी आणि मेहनती खेळाडुंच्या कामागिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.




Powered By Sangraha 9.0