नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेअर यांनी रविवारी सांगितले की, कॅनडास भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत.
कॅनडाचे संरक्षण मंत्री ब्लेअर यांनी रविवारी ग्लोबल न्यूजने आयोजित वेस्ट ब्लॉकवर प्रसारित केलेल्या मुलाखतीत सांगितले की, आरोपांची चौकशी सुरू असताना कॅनडा भारतासोबत भागीदारी सुरू ठेवेल. भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत. कॅनडा देश इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी सारख्या भागीदारीचा पाठपुरावा करत राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारतविरोधी कारवायांसाठी जगभरातून पाठिंबा न मिळाल्याने कॅनडाने नरमाईचा सूर लावला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाचे खासदार चंद्रा आर्य यांनी रविवारी खलिस्तानी अतिरेक्यांविरुद्ध कारवाई न करण्यासाठी स्वतःच्या सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले की, अतिरेक्यांनी दिलेल्या धमक्यांनंतर हिंदू कॅनेडियन घाबरले आहेत. लिबरल पक्षाच्या खासदाराने हिंदू कॅनेडियन लोकांना धमकावल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे आणि समुदायाला शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गुरपतवंत सिंग पन्नून आणि इतर अतिरेक्यांनी कॅनडातील हिंदू समुदायाला धमक्या दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.