ई-कॉमर्स क्षेत्राची कौतुकास्पद भरारी

25 Sep 2023 20:08:52
Article On Indian E Commerce Business

भारतीय ई-कॉमर्स क्षेत्राची वाढ २७ टक्के चक्रवाढ दराने होत असून, २०२६ पर्यंत यातील उलाढाल २०० अब्ज डॉलर इतकी झालेली असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या जीडीपीत २०२५ पर्यंत या क्षेत्राचे योगदान ११.५ टक्के इतके असेल. कर महसूलात वाढ करणारे क्षेत्र, असाही त्याचा लौकिक झाला आहे. त्यानिमित्ताने...

भारतीय बाजारपेठेत ‘अ‍ॅमेझॉन’ तसेच ‘फ्लिपकार्ट’ने ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत सणासुदीच्या हंगामात एकत्रितपणे ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले, असा अंदाज व्यक्त होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ‘अ‍ॅमेझॉन’चा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ आणि ‘फ्लिपकार्ट’चा ‘बिग बिलियन डेज,’ हे विशेष उलाढाल करणारे ठरले. याअंतर्गत विशेषतः स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, कपडे यांच्या विक्रीवर विशेष सूट दिली जाते. एका अहवालानुसार, ‘अ‍ॅमेझॉन’ची उलाढाल ३० हजार कोटी इतकी असेल, तर ‘फ्लिपकार्ट’ २२ हजार कोटी रुपये कमावेल.

याच अहवालात असेही नोंद करण्यात आले आहे की, भारतातील ई-कॉमर्स विक्री गेल्या वर्षी १.१ लाख कोटी इतकी झाली होती. यावर्षी ती १.४ लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ई-कॉमर्स विक्रीतील वाढ, ऑनलाईन खरेदीकडे वाढलेला कल, मध्यमवर्गीयांची वाढती संख्या आणि त्यांची वाढलेली क्रयशक्ती, यामुळे ई-कॉमर्स क्षेत्राला तेजी आलेली आहे. विशेषतः सणासुदीचा हंगाम हा या कंपन्यांसाठी महत्त्वाचा काळ. वार्षिक विक्रीतील बहुतांश विक्री या हंगामात होते. म्हणूनच ‘अ‍ॅमेझॉन’ तसेच ‘फ्लिपकार्ट’ आकर्षक जाहिराती करीत जास्तीतजास्त ग्राहक आपल्याकडे कसे येतील, यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात.

‘असोचेम’च्या अहवालानुसार, २०२५ पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये ई-कॉमर्स क्षेत्राचे योगदान ११.५ टक्के इतके असेल. या क्षेत्राचे मूल्य ६२.७ अब्ज डॉलर इतके आहे. २०२६ पर्यंत ते तब्बल २०० अब्ज डॉलरपर्यंत विस्तारेल, असेही हा अहवाल म्हणतो. भारतीय अर्थव्यवस्थेतील ते सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र ठरले असून, २७ टक्के चक्रवाढ दराने ते वाढत आहे. देशातील मध्यमवर्गाची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांच्या क्रयशक्तीत होणारी वाढ देशाच्या अर्थकारणाला बळकटी देत आहे. अर्थातच, या क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत असून, हे क्षेत्र रोजगार उत्पन्न करणारे तर ठरले आहेच; त्याशिवाय कर महसूलही वाढवत आहे. उत्पादन क्षेत्राला चालना देत आहे.

भारतीय ई-कॉमर्स क्षेत्र

उत्पादनांची मागणी वाढल्याने उत्पादन क्षेत्रालाही चालना मिळत आहे. हे क्षेत्र विकासाच्या प्रारंभीच्या टप्प्यात असले, तरी जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स बाजारपेठेपैकी एक बनण्याची त्याची क्षमता आहे. या क्षेत्राला काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्याची वाढ अपेक्षित प्रमाणात होत नाही. देशातील अनेक भागात अद्याप पायाभूत सुविधांचा अभाव आहे, जसे की रस्ते आणि लॉजिस्टिक नेटवर्क, ज्यामुळे ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचवणे कठीण होते. काही संकेतस्थळांवर बनावट उत्पादनांची विक्री केली जाते. या समस्येवर उपाय लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे. भारतीय कंपन्यांना ‘अ‍ॅमेझॉन’ तसेच ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या विदेशी कंपन्यांकडून मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. मात्र, भारतीय कंपन्या या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत आपला विस्तार करीत आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात २.२ लाख कोटी रुपयांचा महसूल ई-कॉमर्स कंपन्यांनी कमावला, असा अंदाज आहे. मागील वर्षापेक्षा तो ३० टक्क्यांपेक्षा अधिक राहिला. ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट‘, ‘मिंत्रा’, ‘मीशो’, ‘पेटीएम मॉल’ हे भारतातील प्रमुख खेळाडू असून, या कंपन्यांचा एकत्रित महसूल ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ई-कॉमर्स बाजारपेठेची वाढ ग्राहक आणि व्यावसायिक या दोघांसाठी फायदेशीर असून, ग्राहकांना कमी किमतीत, त्याला हवे ते उत्पादन मिळते, निवडीसाठी त्याच्यासमोर अनेक पर्याय असतात;

तसेच ऑनलाईन खरेदीची सोय होते. काही उत्पादने ३० दिवसांत बदलून मिळण्याचा पर्यायही त्याला उपलब्ध होतो. हे सर्व घटक चालना देणारे ठरत आहेत. हे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने करचोरीची शक्यता जवळपास बाद होते. म्हणूनच सरकारच्या महसूलातही वाढ होताना दिसून येते. ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून जास्तीची विक्री होत असल्याने तसेच जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय उत्पादकांनाही मिळतो. त्यामुळे त्यांचाही फायदाच होताना दिसून येतो. २०२५ पर्यंत हे क्षेत्र सात लाख कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय बाजारपेठेतील ई-कॉमर्स क्षेत्र तुलनात्मक प्राथमिक अवस्थेत असले, तरी येत्या काही वर्षांत जे जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स क्षेत्रांपैकी एक झालेले असेल.

भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात ‘स्टार्टअप’ची लाट उदयास येताना दिसून येते. हे स्टार्टअप किराणा माल, फॅशन, सौंदर्य यांसारख्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करताना दिसून येतात. ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच खरेदीचा अनुभव सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. म्हणूनच बाजारपेठेतील प्रस्थापित कंपन्यांसमोर ते चांगली कामगिरी करताना दिसून येतात. ‘सोशल कॉमर्स’ हा ई-कॉमर्सचा एक प्रकार असून, खरेदीदार आणि विक्रेते यांना एकत्र आणण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

लहान व्यवसायांसाठी त्यांची उत्पादने ऑनलाईन विकण्यासाठी तो सोयीस्कर तसेच परवडणारा पर्याय आहे; त्याशिवाय ‘व्हॉईस कॉमर्स’ही खरेदीला हातभार लावत आहे. स्थानिक ई-कॉमर्समध्ये ग्राहकाला प्रादेशिक भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याने, त्याला त्याच्या मातृभाषेत ऑनलाईन खरेदी करणे सोयीस्कर ठरते. विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीण ई-कॉमर्स क्षेत्राच्या विकासावर लक्ष देण्यात येत आहे. म्हणूनच भारतीय ई-कॉमर्स क्षेत्र येत्या काही वर्षांत जलद वाढीसाठी सज्ज होत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. भारतीय बाजारपेठेचे चित्रच बदलण्याची क्षमता या क्षेत्रात आहे.

संंजीव ओक 
Powered By Sangraha 9.0