शिल्पकलेतील भगवान

24 Sep 2023 20:49:45
Article On sculptor Bhagwan Rampure

नर्मदा नदीकाठी ओंकारेश्वर तीर्थस्थानाजवळ आद्य शंकराचार्यांची १०८ फुटी धातूत घडवलेल्या मूर्तीचे नुकतेच लोकार्पण झाले. ही मूर्ती ज्यांनी घडवली, ते महाराष्ट्रातील सोलापूर येथील भगवान रामपुरे यांच्याविषयी...

मातीशी बोलावं लागतं सतत. ती आपल्या कल्पना मूर्त रुपात आणू शकते. तिला समजून घ्यावं, जाणून घ्यावं आणि मग सांगत राहावं, आपल्या स्पर्शांनी, तुम्ही सांगाल तसा आकार ती धारण करते. तिच्याशी आपलं नातं तसं जन्मापासूनच दृढ. रांगत्या मुलांना पण दाराबाहेरील अंगणातल्या मातीची ओढ असते. आपली खेळण्यासाठीची पहिली मैत्रीण म्हणजे माती. मातीच आपल्या सर्जनशील स्वभावाची पहिली साक्षीदार असते. जसजसे आपण मोठे होतो, आपलं विश्व बदलतं आणि मातीशी असलेली आपली नाळ दुरावत जाते. पायात चप्पल आली की, तिचा आपला अबोला इतका वाढतो की, तिचा स्पर्शही आपल्याला नको होतो; पण शेतकरी, मूर्तिकार, कुंभार हे तसे नशिबवानच!

ग. दि. माडगूळकरांची कविता आहे ना-‘तू वेडा कुंभार.’ मातीशी खेळणारा आणि विविध प्रकारांची माती भांडी बनवणारा कुंभार आणि या विश्वासही खेळविणारा विठ्ठल म्हणजे एकच आहेत, असं त्यांचं म्हणणं. शेतकरी मातीला आकार देत नसला तरी तिचा पोत, तिच्यातील सत्व समजून तिचा योग्य प्रकारे वापर करून घेतो आणि मूर्तिकार तर मातीला माध्यम म्हणून वापरतो. त्याच्या अफाट कल्पनाविस्ताराला, सौंदर्यासक्तीला जगासमोर आणण्याचं काम करते ती, असेच एक शिल्पकार म्हणजे भगवान रामपुरे.

सोलापुरातील रामवाडीत एका मूर्तिकारांच्या घरी भगवान यांचा जन्म झाला. वडील मूर्ती घडवत, ते पाहत भगवान मोठे झाले. लहानसहान मूर्ती बनवून घराला हातभार लावत होते. पुढे ज. जी. कला महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि हातच्या सरस्वतीला प्रशिक्षित कला देवीचे अधिष्ठान लाभले. ‘जी डी आर्ट डिप्लोमा इन स्कल्प्चर अ‍ॅण्ड मॉडेलिंग’ ही पदविका त्यांनी घेतली. मूळचे भावनाप्रधान मन, त्यातून समृद्ध झालेल्या जाणिवा, घरातून मिळालेली मूर्तिकलेची देण आणि सरस्वतीचा वरदहस्त, अशा चौकडीच्या साहाय्याने मुंबईत आल्यावर यांच्या कलात्मकतेला अनेक धुमारे फुटले. त्यांची कला खरी बहराला आली ती याच काळात. पुढे प्रसिद्धीच्या झोतात आल्यावरही त्यांचे हात थांबले नाहीत की, मंदावले नाहीत. आजही त्याच उत्साहाने, एखादी वस्तू आवडल्यास भगवान हात सरसावून कामाला लागतात. यातूनच त्यांच्यातील सच्च्या कलाकाराचे दर्शन होते.

सोलापुरात ‘रामपुरे आर्ट्स’ नावाचा त्यांचा भव्य स्टुडिओ आहे. हिरवाईच्या छायेत नटलेल्या या स्टुडिओत पायरीपायरीवर आणि अंतराअंतरावर त्यांनी आपल्या कलाकृती मांडून ठेवल्या आहेत. स्टुडिओला भेट देणार्‍या प्रत्येकाला आपली स्वतःची आणि आपल्याला घडवणार्‍या या कलाकाराची ओळख ती शिल्प देतायत. अगदी निश्चल. एकदा मूर्ती पूर्ण झाली, तिच्यावरून शेवटचे हात फिरले की, कोणत्याही प्राणप्रतिष्ठापनेच्या उपचाराशिवाय तिला एका जीवंतपणा येतो. मूर्तीला चैतन्याचं दान पाहणार्‍याची नजरच देते आणि एका भेटीत हा दृढ भावनिक सेतू त्या कलाकृतीशी आपला बांधला जातो. पूजेपूर्वीच गणपती बाप्पाच्या मूर्तीशी आपले सूत जुळत नाही का? तसंच तर स्टुडिओच्या आवारातल्या या सर्व मूर्ती केवळ प्रेक्षणीय नाहीत, तर आपल्याला काही सांगत असतात. ते ऐकताना आपण भगवान यांना समजून घेत असतो. शिल्पाकडे किंवा वस्तूकडे पाहण्याची त्यांची नजर खूपच प्रामाणिक आहे. आपल्याला सुंदर वाटतंय म्हणून थोडासा बदल करून ते मूळ प्रेरणेच्या अस्तित्वाला बंधनं घालत नाहीत, उलट यांच्या मोकळ्या अभिव्यक्तीने आपल्याला सर्वच सुंदर वाटू लागतं.

दगड, धातू, प्लास्टर ऑफ पॅरिस, फायबर ग्लास आणि मातीसुद्धा, अशा अनेक माध्यमांचा आधार घेऊन ही शिल्प तयार होतात. त्यांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी असतात, त्यांच्यातील पूर्णत्वाचे आणि अपूर्णतेचेही अर्थ असतात. ते जसे शिल्पकाराचे वेगळे तसे आपापले वेगळे असू शकतात. शिल्प म्हणजे एक साहित्यकृतीच. तिच्यातून अभिप्रेत असलेल्या अर्थांना मर्यादा नाहीत. याबाबतीत गहन आणि गूढ वाटते. ती अमूर्त शैलीतील गणेशमूर्ती. एका एका शिल्पाकृतीची सूक्ष्म चिकित्सा दीर्घ रसग्रहण होऊ शकेल, तेव्हा तिच्या वैशिष्ट्याकडे न वळता आपण कलाकाराला जाणून घेऊ.

‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’च्या इमारतीसमोर मस्तवालपणे उभे असलेले सत्ता आणि स्वामित्वाचे मनस्वी स्वैर प्रतिनिधित्व करणारे वृषभ शिल्प असो की, मंद स्मित करणारे, निमुळत्या, ओघवत्या, स्पर्श करावा, असे वाटावे इतक्या सुंदर बोटांचे भगवान बुद्ध. रामपुरे यांनी एक २५ फूट उंचीचे शिल्प मस्कतमधल्या सुलतान काबूज रोडवर उभारले आहे. त्यात एक गुलाबाचे झाड आहे. त्या झाडाची मुळे कुंडी फोडून आत जमिनीत घुसली आहेत. काय कल्पना! एक नवयौवना कुणाचीतरी आतुरतेने वाट पाहून थकलेली अधोवदना गौरी कर्णिकचे शिल्प, बॅले करणारी रशियन युवती, योगी महाराज, कवी ग्रेस, विजय तेंडुलकर, दीनानाथ मंगेशकर आणि आशा भोसलेसुद्धा, अशी कितीतरी व्यक्तिशिल्पे सुद्धा आहेत. आशा ताईंचे तर मुलाखतीदरम्यान बोलताना शिल्प त्यांनी केले आहे. कमी वेळेत आणि प्रतिकूल परिस्थितीत!

नुकतेच ओंकारेश्वर येथे वासुदेव कामत यांच्या चित्रावरून आदी शंकराचार्यांचे बटुरुपातील १०८ फुटी शिल्प धातूत केले आहे. त्यांच्या या शिल्पप्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0