ठाणे : ढोल - ताशांचा कडकडाट बेंजो - स्पिकरचा टिपेला गेलेला सूर फटाक्यांची आतिषबाजी अशा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे यंदा दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान शंभर डेसिबल आवाजाची पातळी ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात नोंदवण्यात आली. या भागात बुधवारी दीड दिवसांच्या गणरायाच्या मुर्त्यांचे विसर्जन होताना विशिष्ट वेळेवर किती डेसिबल आवाजाची कोणत्या वाद्यांमुळे नोंद झाली, याप्रश्नी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी लक्ष वेधले आहे.
दीड दिवसांच्या गणपतींचे ठाण्यात वाजतगाजत विसर्जन झाले. मात्र या काळात विसर्जन मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाद्यांमुळे नागरिकांच्या कानठळ्या बसल्या. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गोखले रोडवर रात्री साडेआठ वाजता ९० तर राम मारुती रोडवर साडेनऊ वाजता ९५ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी ढोल - ताशा पथक व बेंजो आणि स्पीकरमुळे आवाजाचा स्तर उच्च होता. तर पाचपाखाडी येथील पालिका मुख्यालयासमोर असलेल्या कचराळी तलावाबाहेर रात्री दहा वाजता कर्णकर्कश वाद्यांमुळे ८५ ते ९० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली.
वर्तकनगरात तुलनेने कमी
लोकमान्यनगर, सावरकर नगर, समतानगर, यशोधन नगर, महात्मा फुले नगर येथील विविध गणेशमूर्त्यांचे विसर्जन उपवन येथील कृत्रिम तलावात केले जाते. या तलावाकडे जाणारा मार्ग वर्तकनगर येथून जातो. याठिकाणी तुलनेने सर्वात कमी ७० डेसिबल आवाजाची नोंद झाली. रात्री सव्वादहा वाजता ही नोंद करण्यात आली.
उशिरा रात्रीच्या धिंगाण्याने ठाणेकर हैराण
मासुंदा तलाव परिसरात उशिरा रात्री सव्वा बारा वाजता ९० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. त्याआधी ११ वाजता याठिकाणी ९५ ते १०० डेसिबल आवाजाची नोंद सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केली. उशिरा रात्रीपर्यंत सुरु असलेल्या या आवाजी धिंगाण्याने या भागातील नागरिक हैराण झाले होते.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq