शेणातुन साकारला ‘मोरया’

23 Sep 2023 18:29:57


Ecofriendly Ganesha


मुंबई :
पर्यावरणपुरक गणेश मुर्ती आणि आरास करण्याकडे यंदा अनेकांचा कल दिसुन आला आहे. पीओपीच्या मुर्त्यांऐवजी शाडू मातीच्या मुर्तींना दिले गेलेलं प्राधान्य उल्लेखणीय आहे. त्याचबरोबर पर्यावरणपुरक आरास म्हणजेच थर्मोकॉल किंवा प्लास्टीक व्यतिरिक्त सजावटीच्या वस्तुंचा ही वापर करण्यात आला आहे. अशातच गाईचे शेण आणि शेतातील मातीचे मिश्रण वापरुन सिंधूदुर्गतील कुडाळ येथे गणेशमुर्ती साकारण्यात आल्या आहेत.

पर्यावरणपुरक कलेचं ‘३’रं यशस्वी वर्षं

२०२० म्हणजेच जग ऐन कोव्हीड महामारीचे युद्ध लढत असताना सिंधुदूर्गतील कुडाळ येथे वर्षानुवर्षे मुर्तीकाम करणाऱ्या एका कार्यशाळेत गोमय गणेशमुर्ती घडविण्याचा शुभारंभ झाला. पहिल्या वर्षी प्रायोगिक ३० मुर्ती घडविल्या. दुसऱ्या वर्षी याबाबत अनेकांना माहित होऊन ५ पट अधिक म्हणजेच १५० गोमय मुर्तींची मागणी आली. तर, या वर्षी ही संख्या दुप्पट झाली असुन ३०० गोमय गणेशमुर्ती या कारखान्यात साकारल्या गेल्या आहेत. या गोमय मोरयाची चर्चा चांगलीच रंगात आहे.


Ecofriendly Ganesha


मुंबई पुण्यातुन वाढती मागणी


देशी गाईचे शेण, गोमुत्र आणि स्थानिक शेतातील माती यांचा वापर करुन १००% पर्यावरणपुरक मुर्ती असल्यामुळे ग्राहकांची चांगली मागणी आहे. गेल्या तीन वर्षांत मागणी वाढत असुन कोकण आणि सिंधूदुर्गच नाही तर, मुंबई पुण्यातुन ही या मुर्तींची मागणी वाढली आहे. सामान्यांबरोबरच काही स्थानिक तसेच इतर राजकीय नेत्यांनीही या गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यामुळेच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातुन जागृक असलेल्या मुंबई पुण्यासारख्या शहरी भागांतुनही या मुर्तींना चांगली मागणी आहे.

गोमय मोरयाची वैशिष्ट्ये


१००% पर्यावरणपुरक असलेली ही गोमय गणेशमुर्ती पीओपी मुर्तींसाठी एक उत्तम पर्याय आहे. सामान्य मुर्तीसारखेच यावर रंगकाम ही करता येते. परंतु, रंग नसलेल्या गोमय गणेशमुर्ती ग्राहकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. शाडू मातीपेक्षा वजनाने हलक्या असलेल्या या मुर्ती वाहतुकीस ही सोप्या आहेत. घरातल्या घरातच या मुर्तींचे विसर्जन करता येत असुन त्यांचे पाण्यात १००% विघटन ही होते.

मुर्ती साकारण्यास ‘भगीरथ’ प्रयत्न

गोमय गणेश मुर्तींच्या कल्पनेला मुर्त रुप देण्याच्या कामात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत यांची पुर्ण मदत झाली. या उपक्रमातील आर्थिक पाठबळापासून ते प्रशिक्षणाच्या कामात ही संस्था कार्य करत आहे.
“पीओपी बंद करा असं म्हणण्याऐवजी लोकांना आपण पर्याय द्यायला हवेत तरच बदल दिसुन येतो. गोमय गणेशाचा असाच पर्याय आम्ही दिला आणि लोक त्याला चांगल्या पद्धतीने स्वीकारत आहेत. येत्या काही वर्षांत हे मॉडेल लोकप्रिय होणार असा विश्वास वाटतो.”

- प्रसाद देवधर
अध्यक्ष, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान 



“वजनाने हलक्या आणि सुबक असल्यामुळे स्थानिक तसेच मुंबई, पुणे,गोवा, औरंगाबाद येथुन मोठी मागणी आहे. तीन वर्षांपासून घडवत असलेल्या गोमय मूर्तींनी यंदा चांगली मागणी धरली असुन ४०० मुर्ती घडवल्या आहेत.”

- विलास मळगावकर,
गोमय गणेश, मुर्तीकार




Powered By Sangraha 9.0