सचिन तेंडुलकर यांनी मोदींना दिली भारतीय संघाची जर्सी भेट!

23 Sep 2023 16:13:43
Sachin Tendulkar Gift PM Narendra Modi Team India Jersey in Varanasi

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पायाभरणी पार पडली. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मोदींना भारतीय संघाची जर्सी भेट दिली. यामध्ये जर्सीवर 'नमो' नाव असून त्याला एक नंबर देण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘ओम नमः पार्वती पतये’ आणि ‘हर-हर महादेव!’ ने केली. भारतातील शिवशक्ती बिंदूवर चंद्राच्या आगमनाला एक महिना पूर्ण होत असताना आपण अशा दिवशी काशीला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर तर दुसरे शिवशक्तीचे स्थान काशी येथे असल्याचे त्यांनी सांगितले.

काशीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केवळ वाराणसीच्या तरुणांसाठीच नाही तर पूर्वांचलच्या तरुणांसाठीही वरदान ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर ३० हजारांहून अधिक लोकांना येथे बसून सामने पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हापासून या स्टेडियमची छायाचित्रे समोर आली आहेत, तेव्हापासून काशीमधील प्रत्येक रहिवाश्यांला आनंद झाला आहे. ते म्हणाले की, आज क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात असून क्रिकेट खेळण्यासाठी नवनवीन देश पुढे येत आहेत.
 
तसेच आज भारताला क्रीडा क्षेत्रात जे यश मिळत आहे ते देशाच्या विचारसरणीतील बदलाचे परिणाम असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘जो खेलेगा, वही खिलेगा’ असा नाराही त्यांनी दिला. क्रीडाविषयक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो, असे ते म्हणाले. त्यांनी ‘खेलो इंडिया’ मोहिमेचाही उल्लेख केला, ज्या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावंतांना संधी मिळत आहे. या काळात पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत रोड शोही केला.



Powered By Sangraha 9.0