नागपुरात पुरसदृश्य परिस्थिती; देवेंद्र फडणवीसांचे जनतेला आवाहन

23 Sep 2023 11:11:04
Devendra Fadnavis on Nagpur Floods

नागपुर
: मुसळधार पावसामुळे काल रात्री नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिली. त्यामुळे नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

तसेच एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.त्याचबरोबर मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे.

दरम्यान अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचत आहेत. तसेच नागपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.त्याचबरोबर नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या २ चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे ही देवेंद्र फडणवीसांनी सोशल मिडीयाच्या माध्यामातून लोकांना सांगितले.


Powered By Sangraha 9.0