श्री. र. वर्तक लिखित ‘स्वा. सावरकरांची प्रभावळ (भाग-१)
23-Sep-2023
Total Views |
या लेखमालेच्या मागील चार भागात मी तुम्हाला बंगालमधील सशस्त्र चळवळीची ओझरती ओळख करून दिली. आता आपण पुन्हा महाराष्ट्राकडे वळूया...
सावरकरांची प्रभावळ‘ हे पुस्तक लिहिले आहे सावरकरांबरोबर प्रत्यक्ष काम केलेल्या श्रीधर रघुनाथ वर्तक यांनी. यामध्ये सावरकरांच्या अनुयायी असलेल्या सुमारे ३० व्यक्तींची अगदी छोटीशी चरित्रे आली आहेत. ‘अभिनव भारत’ ही संस्था सावरकरांनी १९५२ मध्ये विसर्जित केली आणि १९५३ सालच्या मे महिन्यात ‘अभिनव भारत मंदिर’ या नावाने हुतात्म्यांचे एक स्मारक स्थापन केले. ‘वर्तक’ या संस्थेचे विश्वस्त आणि अध्यक्ष होते. १९७२ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला शं. रा. दाते यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
या क्रांतिवीरांपैकी काही जणांनी तात्याराव यांच्या प्रत्यक्षबरोबर काम केलेले आहेत, तर अनेक जण जॅकसन वधाच्या खटल्यातील शिक्षा झालेले आरोपी आहेत. या सर्वांनी प्रेरणा घेतली होती, ते प्रभावित झाले होते तात्याराव यांच्यामुळे. त्यामुळे पुस्तकाचे नाव ठेवण्यात आले आहे - ‘सावरकरांची प्रभावळ.’ या बहुतेक व्यक्ती नाशिक शहरात राहणार्या होत्या.
त्यांची नावे अशी - शाहिर गोविंद त्रिंबक तथा आबा दरेकर, कृष्णाजी बळवंत महाबळ, विष्णू महादेव भट, सखाराम दादाजी गोर्हे, कृष्णाजी गोपाळ खरे, गोपाळ कृष्ण पाटणकर, कृष्णाजी गोपाळ कर्वे, अनंत कान्हेरे, विनायक नारायण देशपांडे, वामन नारायण ऊर्फ दाजी जोशी, शंकर सोमण , वामन सखाराम तथा बाबासाहेब खरे , बाळकृष्ण जनारदन मराठे, शंकर नारायण मोघे, दाजी नागेश आपटे, नारायण तथा धोंडो रघुनाथ (नाना) वर्तक, त्रिंबक रघुनाथ वर्तक, श्रीधर रघुनाथ वर्तक, गणेश बाबाजी काथे, रामचंद्र बाबाजी काथे, विश्वनाथ विनायक केळकर, महादेव बळवंत गाडगीळ, विठ्ठल बाळकृष्ण जोशी, हरी अनंत थत्ते, विष्णू गणेश केळकर, गणेश वासुदेव जोगळेकर, रामभाऊ केशव दातार, वामन केशव दातार, दामोदर महादेव चंद्रात्रे आणि डॉ. वासुदेव विष्णू आठल्ये. या सर्वांची तसेच त्यांच्या कुटुंबांची प्रत्येकी दोन-तीन पाने माहिती या पुस्तकात वर्तक यांनी दिलेली आहे. याशिवाय ‘भगूरचे बालमित्र’ या नावाचे एक प्रकरणदेखील लेखकाने लिहिले आहे. वर दिलेल्या व्यक्ती सोडून इतरही अनेकांचा उल्लेख या पुस्तकात आला आहे. त्याशिवाय मित्रमेळा (नाशिक शाखा), अभिनव भारत मंदिर, मित्रमेळा (मुंबई शाखा) यांच्याविषयी स्वतंत्र प्रकरणे लिहिलेली आहेत. त्यामुळे त्या काळात घडलेल्या अनेक घटनांचा तसेच अनेक देशभक्तांच्या कार्याचा महत्त्वाचा दस्तऐवज तयार झाला आहे.
या सगळ्या देशभक्तांनी कमीअधिक प्रमाणात इंग्रजांच्या दडपशाहीला निर्भयपणे तोंड दिले. अनेक जण आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून सशस्त्र चळवळीत सामील झाले. इंग्रजांकडून होणारा छळ, घरावर येणार्या जप्त्या, पोलिसांची पाळत, संसाराची परवड, नोकरीवर येणारी गदा आणि कदाचित प्रदीर्घ तुरुंगवास असे सगळे भवितव्य दिसत असतानाही या अगदी सामान्य कुटुंबातील वीरपुरुषांनी आपल्या देशासाठी असामान्य कामगिरी बजावली.
यातील अनेक व्यक्ती आणि त्यांनी केलेला असामान्य त्याग याची माहिती महाराष्ट्रात तर सोडाच, पण खुद्द आमच्या नाशिकमध्येही फारशी कोणाला नाही. त्यामुळेच या पुस्तकाचे मोल मोठे आहे. लेखक श्री. र. वर्तक हे या सर्व क्रांतिवीरांचे समकालीन होते, घडलेल्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि या चळवळीत सहभागीदेखील झाले होते. त्यामुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले आहे आणि ते पूर्णपणे विश्वासार्ह बनले आहे. हे पुस्तक बरेच दिवस उपलब्ध नव्हते. त्यामुळे ‘अभिनव भारत मंदिर’ या संस्थेने त्याची दुसरी आवृत्ती २०१० मध्ये प्रकाशित केली आहे. या आवृत्तीच्या प्रकाशनात माझाही थोडा हातभार लागला, याचे मला खूप समाधान वाटते.
वर उल्लेख केलेल्या क्रांतिवीरांपैकी काहींची ओळख मी या लेखमालेतून याआधीच करून दिली आहे. इतरांची ओळख आपण पुढील भागापासून करून घेणार आहोत.