भारतीय खेळाडूंना चीनने व्हिसा नाकारला, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला दौरा रद्द

22 Sep 2023 18:55:19


anurag thakur

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाचा भारताने निषेध केला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा आपला दौरा रद्द केला आहे.

चीनच्या हांगझोऊ शहरात २३ सप्टेंबर, २०२३ पासून  १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचा संघही सहभागी होणार आहे. या सामन्यांना जाणाऱ्या भारतीय संघातील काही खेळाडूंना चीनने व्हिसा नाकारला होता. हे खेळाडू अरुणाचल प्रदेशचे असून वुशू खेळाशी (मार्शल आर्ट) संबंधित आहेत. न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मापुंग लामगु अशी या खेळाडूंची नावे आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील चिनी दूतावास आणि बीजिंगमधील दूतावासाच्या माध्यमातून चीनच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात आपले निवेदन जारी केले आणि म्हटले की, अरुणाचल भारताचा भूभाग होता, आहे आणि राहील. त्याचप्रमाणे चीनचे हे वर्तन आशियाई खेळांच्या भावना आणि नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0