आगामी काळ तसा एकूणच भारताच्या प्रगतीची वाट सुकर करण्यासाठी अनेक अर्थाने दिशादर्शक ठरणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना, प्रकल्प, धाडसी निर्णय, प्रभावी, परिणामकारक धोरणे यशस्वी करून दाखवित गेल्या नऊ वर्षांत याची पायाभरणीच केली. त्यामुळे या प्रगतीत भारताच्या कानाकोपर्यात त्या समकक्ष कार्य अविरत सुरू राहणे अत्यावश्यक आहे. केवळ राजकीय विरोध आणि अनाठायी वक्तव्ये करून ही दिशा भरकटणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक. कारण, नको ती आणि कोणत्याही देशहिताच्या दृष्टीने योग्य नसणार्या सनातन धर्माचा मुद्दा पेटवून देत, आपल्याच देशातील काही नतद्रष्ट मंडळी नागरिकांचे लक्ष वळवून जे चांगले कार्य सुरू आहे, त्याला दुय्यम ठरवीत असतात. अर्थात, यामुळे देशाची प्रतिमा मलिन ठेवण्याचा त्यांचा मनसुबा सफल होत असतो. असे असले तरी सुज्ञ नागरिक अशा रिकामटेकड्यांना जागा दाखवित असतात. भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकप्रतिनिधींसाठी नवी संसद उभारण्यात आली आणि श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्याच्या कामकाजाही शुभारंभ झाला. एवढेच काय, जुन्या संसद भवनाची वास्तूदेखील एक महत्त्वपूर्ण ठेवा म्हणून दिमाखात मिरवत राहणार असल्याने इतिहासाचे एक सुवर्णपान लिहिले गेले. येणार्या नव्या पिढीसाठी या दोन्ही वास्तू देशसेवा करण्यास प्रवृत्त करतील, हा विश्वास सर्वांनी बाळगला पाहिजे, अशा भारताचा, त्यासाठी कार्यरत ’त्यांचा’ जगात गौरव होत असताना, काहींना भलतेच उद्योग करण्याची सवय जडली आहे. सत्तेत राहून गैरकारभार, भ्रष्टाचार करायचा, लोककल्याणकारी योजनांच्या नावावर केवळ विकास करीत असल्याचे आश्वासन द्यायचे आणि केवळ आपल्या सभोवतीच्या लोकांना सत्तेचा मलिदा खाऊ घालायचा, ही वृत्ती त्यांनी जोपासली. त्या तुलनेत मोदींनी नऊ वर्षांत अनेक लक्षणीय सुधारणा घडविताना, ही मलिदा लाटण्याची सवय जडलेल्यांना वठणीवर तर आणलेच, पण सर्वसामान्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देत त्यांची मने जिंकली, शिवाय भारताचा विदेशातदेखील सन्मान वाढविला.
नव्या संसद भवनात जे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विशेष अधिवेशनात संपन्न झाले, त्यातून अनेक बाबी स्पष्ट झाल्या. संसद सभागृह केवळ गोंधळ घालण्यासाठी असते, असे वाटणार्या लोकप्रतिनिधींना या अधिवेशनात ती संधी मिळाली नाही. उलट या देशात गेली कित्येक वर्षे केवळ समान अधिकाराच्या वल्गना करीत महिलांना वाळीत टाकणार्यांनादेखील चपराक देत ’ती’चा विशेष सन्मान करणारे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करवून घेऊन मोठी कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीत काही तरी वाईट शोधत बसायचे, असा नाद लागलेल्यांना कदाचित हे रुचले नाही. मात्र, जे काही या देशात मोदी आल्यापासून होत आहे ते वाईटच आहे, असा दुष्प्रचार करणारे यानिमित्ताने तोंडघशी पडले. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला, तर आपले राजकीय दुकानच काय तर भवितव्यदेखील उरणार नाही, ही जाणीव आत्ताच्या मोदी विरोधकांना असल्याने त्यांनी यास समर्थन दिले तरी काही लोक जातीभेद निर्माण करून, धर्माचा मुद्दा रेटून आपल्या कुटील बुद्धीचा परिचय घडवीत असतात. पण अशांना आता जनता फार महत्त्व देईल, अशी स्थिती राहिली नाही. श्रीराम मंदिर, कलम ३७० रद्दबातल करणे, सीमेवरील तणाव कमी होणे, असे कितीतरी निर्णय-धोरणे योग्य असल्याची देशवासीयांनाही जाणीव झाल्याने विरोधकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे केवळ लोकांमध्ये भ्रम पसरवीत राहण्यात ते धन्यता मानतात. त्यात आता येणार्या काळात महिलांचा सहभागदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने आपल्या पुरुषी वर्चस्ववावर मर्यादा येतील, ही जाणीवदेखील काहींना अस्वस्थ करुन गेली. ’ती’चा सन्मान केवळ विधेयक पारित करून थांबणार नाही, तर तो टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावण्याची जबाबदारी प्रत्येकाची असणार आहे. नव्या संसद भवनात नेहमी नको त्या मुद्द्यांवर गोंधळ घालणार्यांना हा इशारा पुरेसा आहे.
अतुल तांदळीकर