मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी समर्थक हरदीप निज्जरच्या मृत्यूमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे भारत आणि कॅनडामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परंतू, या आरोपाबाबत कॅनडाकडे कुठलेही पुरावे नाहीत.
तरीसुद्धा कॅनडातील वृत्तसंस्था सीबीसीने (कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) या प्रकरणाच्या तपासात कॅनडाच्या सरकारने बरीच माहिती गोळा केली असल्याच्या दावा केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सीबीसीने सुत्रांद्वारे सांगितले की, कॅनडाच्या सरकारने गोळा केलेल्या गुप्तचरांमध्ये कॅनडातील भारतीय मुत्सद्यांशी झालेल्या संभाषणांचाही समावेश आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना गुरुवारी न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या आरोपाबद्दलचा एकही पुरावा सादर करता आला नाही. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आलेत. परंतू, ते वारंवार निज्जरच्या मृत्यूमध्ये भारताचा सहभाग असण्याबाबतच बोलत होते.
जस्टीन ट्रूडो म्हणाले की, "कॅनडामध्ये झालेल्या एका कॅनेडियनच्या हत्येत भारत सरकारचे एजंट सामील होते याबद्दलची अनेक विश्वसनीय कारणे आहेत. आम्ही भारत सरकारला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे तसेच या प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी आमच्यासोबत काम करावे, असे आवाहन करतो, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, "आम्ही आम्हाला मिळालेल्या केलेल्या कोणत्याही विशिष्ट माहितीकडे लक्ष देण्यास तयार आहोत. परंतु, आत्तापर्यंत आम्हाला कॅनडाकडून कोणतीही विशिष्ट माहिती प्राप्त झालेली नाही."
पुढे बागची म्हणाले की, आमच्या बाजूने, कॅनडामध्ये असलेल्या व्यक्तींनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांचे विशिष्ट पुरावे कॅनडासोबत शेअर केले गेले आहेत. परंतु त्यावर कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आम्हाला वाटते की, कॅनडा सरकारचे हे आरोप राजकीय हेतूने करण्यात आले आहेत.