मोरोक्कोतल्या ‘त्या’ मुली!

20 Sep 2023 20:55:03
Morocco earthquake leaves women without menstrual care

मासिक पाळी येऊ नये, यासाठी मुलींना गरोदर राहण्याची जबरदस्ती करणारे जगाच्या पाठीवर खरंच कुठे असतील, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे प्रत्यक्षात घडले ते आफ्रिकेतील मोरोक्को देशात. मोरोक्कोमध्ये दि. ८ सप्टेंबर रोजी भयंकर नैसर्गिक आपत्ती ओढवली. भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि तितकेच लोक बेघर झाले. अशा नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्ती संकटांमध्ये शोषणाची सर्वाधिक भीती अर्थातच मुली- महिलांनाच असते. त्यामुळेच की काय, मोरोक्कोमध्ये भूकंप झाला आणि अनाथ झालेल्या बालिका, महिलांची स्थिती फारच दयनीय झाली. केवळ अंगावरच्या नेसत्या वस्त्रानिशी वाचलेल्या त्या बालिका, महिला. शरीराने आणि मनानेही उन्मळून पडलेल्या...जखमी झालेल्या. भूकंप आला, सगळे बरबाद झाले म्हणून मुली-स्त्रियांची नैसर्गिक जीवनशैली बदलेल का? तर नाहीच.

मासिक पाळी आलेल्या महिलांचे हाल तर शब्दात सांगणे शक्यच नाही. जगभरातून इथल्या भूकंप पीडितांसाठी मदत पाठवली गेली. पण, इथल्या मुलींना ’सॅनटरी पॅड’ म्हणजे काय, हेच माहिती नव्हते. त्यामुळे भूकंपाने सर्वनाश झाला असताना मासिक पाळीचा त्रास नको, असे इथल्या भूकंप पीडित मुली, महिलांना वाटत होते. अत्याचार करणारे दुष्ट लोक असाहाय्य भोळ्या लोकांचा कसा आणि किती गैरफायदा घेतील, हे सांगता येत नाही. इथल्या भूकंप पीडित मुलींना काही दुष्ट लोक सांगत आहेत की, आमच्याशी लैंगिक संबंध ठेवा, गरोदर राहिलात तर किमान एक वर्ष मासिक पाळीतून सुटका!

कट्टरतवादी मुस्लीम देश असलेला मोरोक्को. या देशामध्ये जनसामान्य त्यातही मुलींमध्ये इतके अज्ञान असावे? गरीब- श्रीमंतीची दरी तर लक्षणीय. मुठभर श्रीमंत आणि भाराभर गरीब. हे गरीब सर्वार्थाने गरीबच. या देशात भूकंप आल्यावर जनतेच्या संरक्षणासाठी इथल्या राजाने आणि प्रशासनानेही जमतील तितकी पावलं उचलली. मात्र, लोकांच्या मानसिकतेचे काय? दुष्टवृत्तीच्या लोकांनी इथे दुष्टतेची सीमाच पार केली. मोरोक्कोच्या भूकंप पीडित मुली आता कुणाशीही लग्न करतील, अशा अर्थाचा संदेश या लोकांनी प्रसारित केला. तो असा की, ’तुमच्यापेक्षा घट्ट कपडे घालणार्‍या, खुले कपडे घालणार्‍या आणि तुमच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप सारे पैसे मागणार्‍या बेकार व्यक्तीपेक्षा तुमच्याकडून कधीच काही न मागणार्‍या आणि कसलीच अपेक्षा नसणार्‍या तिच्याशी लग्न करा.’

 याचाच अर्थ इथल्या भूकंपग्रस्त मुली आता असाहाय्यतेमुळे कसलीच अपेक्षा न ठेवता कुणाशीही लग्न करतील, असा होता. त्यानंतर संदेश आला की, ’अल्पवयीन मुलींचे कोणत्याही भीतीशिवाय लैंगिक शोषण करायचे असेल तर इथे जा.’ तसेच असाही संदेश प्रसारित झाला की, ’पुरुषांनी भूकंपग्रस्त ठिकाणी अवश्य जावे. ते तिथे अतिशय लहान मुलींशी विवाह करू शकतील.’ हे सगळे संदेश मुली-महिलांच्या शोषणाचे भयंकर प्रतीकेच म्हणावी लागतील. लिहितानाही प्रचंड संताप आणि दुःख होत आहे. मात्र, या संदेशांचे समर्थन करीत मोरोक्कोचे अपवाद वगळता लोक म्हणत आहेत की, ’आम्ही विवाहित असलो आणि त्या मुली आमच्या मुलीच्या किंवा नातीच्या वयाच्या असल्या तरी त्या संकटात आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही त्यांच्याशी विवाह करू शकतो. आमच्या धर्मात हे मान्य आहे.’
 
यावर एकच वाटते की, संकटात सापडलेल्या अल्पवयीन मुलींशी विवाह करून धर्माने सांगितलेले पुण्य कमावू इच्छिणारे हे लोक त्यांच्याच वयाच्या एकल विधवेशी का बरं लग्न करीत नाहीत? बरं, मग सुरक्षिततेसाठी लहान मुलींशीच लग्नच करणे गरजेचे आहे का? तिला मुलगी किंवा बहीण म्हणून सुरक्षा देऊ शकत नाहीत का? किंवा मग वृद्ध जर्जर महिलांचे काय? याबाबत त्यांची संस्कृती त्यांना काही सांगत नाही का? संकटात सर्वार्थाने सर्वनाश झालेल्या, त्या गरीब, अनाथ मुलींचे धर्माच्या नावाने शोषण करणारे हे लोक मानवतेला कलंक आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये जेव्हा केव्हा नैसर्गिक आपत्ती आली, तेव्हा पहिल्यांदा वृद्ध, दिव्यांग, बालक आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी तातडीने कार्यवाही सुरू केलेली दिसते. अर्थात, भारत आणि मुस्लीम राष्ट्र मोरोक्कोची तुलनाच होऊ शकत नाही. मोरोक्को या बालिकांच्या, महिलांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेणार्‍या नराधमांचा निषेध!


Powered By Sangraha 9.0