गिधाड संवर्धन आणि संरक्षणासाठी जनजागृतीची गरज

02 Sep 2023 10:58:41


Vulture awareness day

मुंबई : जैवविविधतेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पण नेहमीच कमी महत्त्व दिल्या जाणाऱ्या गिधाड निसर्गाचे स्वच्छतादुत म्हणुन ओळखले जातात. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारी गिधाडे आता मात्र संख्येने फार कमी झाली आहेत. गिधाडांविषयी जनजागृती करण्यासाठी २ सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो.


त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वनविभागासोबतच अनेक संस्था ही कार्य करित आहेत. राज्यात सध्या नाशिक आणि रायगडमध्ये गिधाड संवर्धन क्षेत्र आहेत. नाशिकमधील अंजनेरी इथे २०१७ पासुन असलेल्या गिधाड संवर्धन क्षेत्रामध्ये मुख्यतः भारतीय गिधाडे आणि पांढऱ्या पाठीची गिधाडे वास्तव्यास आहेत. २०१५ च्या गणनेनुसार नाशिकमध्ये १५० भारतीय प्रजातीची गिधाडे तर, ५० पांढऱ्या पाठीची गिधाडे आहेत. गिधाड हा पक्षी जलद गतीने प्रजनन करणारा नसल्यामुळे यांच्या संख्येमध्ये अद्याप मोठा फरक पडलेला नसणार, अशी शक्यता वन्यजीव अभ्यासक व्यक्त करतात. नाशिकच्या अंजनेरीमध्ये गिधाड प्रजनन केंद्र सुरू करण्याबाबतही बीएनएचएस संस्थेने पुढाकार घेतला असुन त्याचे काम सुरू आहे.

विशेष बाबी

- हिमालयीन ग्रीफॉन या गिधाडाच्या प्रजातीच्या हिवाळ्यात २-३ वेळा अंजनेरीमध्ये नोंदी
- युरेशियन ग्रीफॉनची गेल्या हिवाळ्यात (२०२२) भारतातील पहिलीच नोंद, त्याला रिंग करुन मुक्त अधिवासात सोडले गेले.
“डायक्लोफेनाक बरोबरच गिधाडांना इतर अनेक धोके आहेत. गिधाडांचे महत्त्व अजुन ही लोकांपर्यंत पोहोचला नाही. तो पोहोचविण्याची नितांत गरज आहे. अधिवास नष्टता आणि अधिवास संवर्धन यावर काम करण्याची मोठी गरज निर्माण झालीये. कारण, प्रजनन केंद्र तर उभारली जाऊ शकतील पण त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. विकास कामांमुळे अनेकदा जैवविविधतेला धोका पोहोचत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन गिधाडांविषयी जनजागृती आणि अधिवास संवर्धनाचं काम केलं पाहिजे.”

 - प्रतिक्षा कोठुळे, वन्यजीव शास्त्रज्ञ 
“रायगड जिल्ह्यामधील चिरगाव, भापट, म्हसळा येथील गिधाड प्रकल्प नैसर्गिकरित्या गिधाड संवर्धनाच्या यशस्वी प्रयत्नाचे दर्शक आहे. यामध्ये देवराई सभोवतालच्या जंगलामधील उंच झाडांचे संवर्धन संरक्षण करून गिधाड्यांसाठीचे परिस्थितीकी पर्यावरण वाचवण्याचे काम केले गेले तसेच भविष्यात अशा प्रकारच्या देवराया वाचवण्याची मोहीम संस्थेने हाती घेतली आणि गिधाडांच्या घरटे बनविण्याच्या जागा निश्चित करून त्यांना अन्न उपलब्ध करून देणे म्हणजेच गिधाडांचे फीडिंग ग्राउंड हे जर व्यवस्थित संवर्धित केले तर गिधाड्यांची संख्या निश्चितच वाढते हे या प्रयोगाने सिद्ध झाले आहे अशा प्रकारे अवघ्या २८ संख्येने २००० साली उरलेली गिधाडे आज मितीस ३५० च्यावर गणसंख्येत जाऊन पोहोचले आहेत."

- प्रेमसागर मेस्त्री, मानद वन्यजीव रक्षक, रायगड





Powered By Sangraha 9.0