नूह हिंसाचारातील आरोपी काँग्रेस आमदार मामन खानचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढणार
19-Sep-2023
Total Views |
चंडीगड : हरियाणामधील नूह येथे झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल काँग्रेसचे आमदार मामन खान यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगीना पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सहा एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींसोबत मामन खान यांचे हिंसाचारपूर्व संभाषण आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेले संदेश रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
एसआयटीने मामन खान यांना चार गुन्ह्यांमध्ये आरोपी बनवले असून दोन वेळा त्यांची दोन दिवसांची कोठडी घेतली आहे. आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी आमदाराला दुपारी एकनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मामनच्या चौकशीत आमदाराचा आयटी सेलही सक्रिय असल्याचं समोर आलं आहे.
मामन खानला न्यायालयात नेताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यंत्रणा सज्ज आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. सकाळपासूनच शहरात बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारात सहभागी लोकांना भडकावल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असलेले काँग्रेस आमदार ममन खान अजूनही चौकशीदरम्यान उत्तरं देण्याचे टाळत आहेत.
अटक करण्यापूर्वी हायकोर्टात याचिका दाखल करताना, घटनेच्या आधी आणि त्या दिवशी आपण शहरात नसल्याचा दावा त्यांनी केला होता. परंतु हिंसाचाराचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सदस्यांनी चौकशीदरम्यान त्याच्या ठिकाणाविषयी प्रश्न विचारले असता, आरोपीने थेट उत्तर दिले नाही आणि ते न्यायालयात आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.