आपला बाप्पा ; आपलं पर्यावरण

    18-Sep-2023
Total Views |


Ecofriendly ganesh

मंगळवार,दि.19 सप्टेंबरपासून राज्यासह देश-विदेशाचा लाडका सण म्हणजेच गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होईल. तेव्हा दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण पर्यावरण संरक्षणाचे व्रत घेऊन, हा उत्सव भक्तिभावाने साजरा करूया. त्यासाठी राज्य सरकार तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने भरघोस बक्षिसांसह विविध स्पर्धांही तितक्याच लक्षवेधी ठराव्यात. त्यानिमित्ताने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करणारा, हा विशेष लेख...





Ecofriendly ganesha

उद्यापासून, बाप्पा येणार! पूर्ण आसमंत, ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषाने दणाणून जाणार. सुंदर मखर असतील, लोक नवनवीन कपडे घालतील. छोट्यांची तर चंगळच असेल नाही का? बर्फी, मिठाई, गोडधोड, पाहुणे, मज्जामस्ती आणि अतोनात दंगा. आज आपण याच आपल्या लाडक्या बाप्पाबद्दल गप्पा मारणार आहोत. गणेश चतुर्थीपासून सणासुदीच्या दिवसांना गती मिळते. भव्य आणि आकर्षक देखाव्यांचे व जल्लोषात चालणार्‍या मिरावणुकींचे आपण साक्षीदार होऊ. सार्वजनिक मंडळांच्या भव्यदिव्य मूर्तींपासून, ते घराघरातील लहान-मोठ्या मूर्तीपर्यंत, जणू दहा दिवस देश बाप्पामय होऊन जाईल. अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत... ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला,’ असे सुर ऐकू येतील. काही ठिकाणी जल्लोषात काही ठिकाणी दाटून आलेल्या कंठातून; पण मग तो दिवस संपल्यावर मात्र सगळे जण, आपापल्या दैनंदिन जीवनात रुजू होतात; पण पर्यावरण मात्र, बदललेले असते! त्यामुळे उद्यापासून सुरू होणार्‍या या सगळ्यांच्या आवडीचा सण साजरा करताना, जमेल तसे आणि जमेल तितके पर्यावरणासाठी योगदान कसे देता येईल, ते आपण पाहूया.
आता तुम्ही म्हणाल,आज तर सुट्टी, सणासुदीचा दिवस, श्रद्धेचा दिवस, तरी आज असल्या पर्यावरणाच्या गप्पा? आपला सण साजरा करणे, हा तर आपला हक्क आहे ना? तर त्याचा निसर्गाच्या संवर्धनाशी किंवा पर्यावरण दक्षतेशी काय संबंध? पण मित्रांनो, विचार करा. आपल्या सनातन धर्मात, असा एक तरी सण आहे का, जो पर्यावरणाशी आणि निसर्गाशी जोडलेला नाही? गणेश चतुर्थी, या उत्सवाचा खरा आनंद मिळवण्यासाठी त्याचे मूळ समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. ‘गण’ म्हणजे समूह असा अर्थ घेतला आणि ‘गणपती’ म्हणजे लोकांना एकत्र आणणारा. यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ -विद्वान, कलाकार, खेळाडू, व्यापारी, मजूर इत्यादी सगळेच. अर्थात, हा सण मानवी समाजाला जोडतो. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणाचं निसर्गाशी नातं आहे. प्राचीनकाळी लोक नद्यांमध्ये स्नान करायचे. पावसाळ्यात, नद्यांचे पाणी ताजे आणि स्वच्छ असते आणि नदीचे किनारे नवीन जमा झालेल्या सुपीक मातीने समृद्ध असतात. लोक याच मातीचा गोल घेऊन, त्याची मूर्ती बनवून श्रद्धेने पूजा करायचे आणि नंतर त्याच पाण्यात विसर्जनदेखील केले जायचे. काही ठिकाणी खड्यांच्या गौरी, काही ठिकाणी उभ्या गौरी.


अर्थात, समुद्रा किनारी राहणार्‍या लोकांमधील ताडाच्या झाडाचा वापर करून व नारळाचे तोंड असलेल्या गौरी, या सगळ्या गोष्टी, गणेशोत्सवाचे ठिकठिकाणीच्या निसर्गाशी कसा संबंध आहे. ही दर्शवून देतात. निसर्गाची, पृथ्वीची आणि पृथ्वीवर राहणार्‍या प्रजातींची उपासना म्हणजे आपल्यातील समान घटकांच्या अस्तित्वाची ओळख. सर्व सजीव पाच घटकांनी बनलेले आहेत आणि हा सण या उपजत एकतेला ओळखतो. अशी गणेश चतुर्थीची सुरुवात होत असे. पण, आताच्या घडीला काय घडतंय?
घरगुती गणपतींपासून ते अगदी सार्वजनिक गणपती मूर्तीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या असतात. मूर्ती आणि देखाव्यांची रंगरंगोटी सजावटीसाठी वापरलेले प्लास्टिक आणि थर्मोकॉलयुक्त वस्तूंचा सर्रास वापर पाहायला मिळतो. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात खर्‍या तसेच कृत्रिम फुलांचा ही वापर केला जातो. या सजावटीच्या वाढत चाललेल्या हव्यासापोटी प्रदूषणाचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढले आहे. या वाढलेल्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम केवळ मानवी जीवनावरच नाही, तर समुद्रातील इतर जीवांवर ही होत आहेत. ’पीओपी’ म्हणजेच ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मध्ये असलेले कॅल्शियम सल्फेट हेमिहैड्रेतचे नैसर्गिक विघटन व्हायला, तर अनेक वर्षं लागतात. यासारखी इतर रसायानेदेखील, जलचरांना भयंकर हानी पोहोचवतात. कारण, त्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होतो आणि हा प्राणवायू कमी झाल्याने अनेक जलचर, मासे मृत्युमुखी पडतात व त्या परिसरातील अन्नसाखळी विस्कळीत होते. न विराघळणार्‍या या मूर्त्यांमधील घटक, तलावात, तिथून नद्यांमध्ये व तिथून समुद्रात प्रवेश करतात आणि त्यांच्या मार्गात, केवळ आणि केवळ विनाश पेरत जातात. काही भव्य मूर्त्यांमुळे मोठा परिणाम दिसून येतो. अंदाजे 100 वर्षांहून अधिक काळासाठी, या मूर्त्यांमूळे प्रदूषण होऊ शकते.


जितकी रंगीबेरंगी आणि चमकदार मूर्ती, तितका विषारी आणि हानिकारक पदार्थांचा वापर! रंगांमधील, शीष, पर, कॅडमियमसारखे धातू जैवविस्तृतीकरण (लळेारसपळषळलरींळेप) आणि जैवसंचय (लळेरलर्र्लीाीश्ररींळेप) या नैसर्गिक प्रक्रियांद्वारे भयंकर विनाश करतात. अशा रसायनांनी पाण्याची आम्लता वाढते, आणि यामुळे (र्उीीीींरलशरपी) अर्थात, कठीण कवच असलेले प्राणी जसे की खेकडे, चिंबोर्‍या आणि पगोळीसारखे प्राणी तर अक्षरशः अतिआम्ल पाण्यात विरघळतात.
पुढे या प्रदूषणाने, जलजन्य रोगांचे प्रमाण वाढते. तसेच त्वचेच्या रोगांचेदेखील प्रमाण वाढते, असे संशोधनातून आढळले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक, धातू आणि सिंथेटिक गोष्टींच्या प्रदूषणाबद्दल वेगळे काही सांगायची गरज आहे? खर्‍या आणि खोट्या फुलांच्या निर्माल्यातून पाण्यात कीटकनाशक, रासायनिक खत आणि अशा अनेक गोष्टी पोहोचतात. प्रदूषित तसेच अनैसर्गिक आणि सडलेल्या-कुजलेल्या गोष्टी संपूर्ण प्रणालींना धोका निर्माण करतात.


हे झाला पाण्याबद्दल; पण आतीषबाजी? वायू प्रदूषण? ध्वनी प्रदूषण? आणि प्रकाश प्रदूषण? गेल्या काही वर्षांत, गणपती, पाडवा, दिवाळी या सणांनंतर तापमानात झालेली वाढ नोंदली गेली आहे. तसेच यातून, बेरियम, कॅडमियम, कार्बन-मोनोऑक्साइड, सल्फर-डायऑक्साइड, नाईट्रेट्स् आणि सल्फेट्स यांसारख्या घातक रसायनांचे वातावरणातील प्रमाण वाढते. या प्रदूषणाने अस्थमाच्या घटना, श्वसनाचे रोग वाढतात. तसेच याला ध्वनी प्रदूषणाची जोड मिळाली की, तात्पुरता बहिरेपणा, अर्धशिशी, तसेच मानसिक आजारदेखील नोंदवले गेले आहेत. आता हे आणि अशा अनेक गोष्टी जर माणसात शक्य होणं आहे. विचार करा, रस्त्यावरील कुत्र्या-मांजरांचे काय होत असेल? उदाहरणार्थ, सजावटींमध्ये सर्रास वापरली जाणारी मोराची पिसे. ही खरंच गळलेली असतात का, मोराला मारून काढलेली? आपण याचा विचार करतो का?


या व अशा अनेक कारणांसाठी गणेशोत्सवासारख्या पावन सणाच्या पर्यावरणीय पाऊलखुणा समजणे महत्त्वाचे आहे, तर आपण काही करू शकतो का? अगदी काही सोपे बदल आहेत. त्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे, ’पीओपी’ आणि इतर अनैसर्गिक गोष्टींचा वापर थांबवणे. मूर्ती बनवायला शाडूची माती किंवा साधी मातीसुद्धा आपण वापरू शकतो. अलीकडील काळात, काही नवनवीन आणि अनोखे पर्यायदेखील समोर आले आहेत जसे की, पेपर पल्प किंवा कायमस्वरुपी ठेवायला धातूची मूर्ती इत्यादी एक सुंदर पर्याय म्हणजे, शाडूची किंवा साध्या मातीची मूर्ती बनवणे, ज्यात आपल्या आवडत्या झाडाच्या बिया असतील. विसर्जन पाण्यात न करिता, बागेत खड्डा खणून केले जाते. जेणे करून, तिथेच आवडीचे झाडदेखील लावता येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्लास्टिकचा वापर टाळणे! तसेच, आतीषबाजीपेक्षा मधुर संगीताचा आनंद घेणे, मस्त पारंपरिक खाद्यपदार्थांचा लाभ घेणे आणि कर्णविकारी ध्वनी प्रदूषण टाळणे. इतके तर सगळ्यांनाच शक्य आहे ना? लक्षात असावे, विरोध हा संस्कृतीला आणि परंपरेला कधीच नव्हता, तो होता तो प्रदूषणाला आणि चुकीच्या पाश्चिमात्य प्रभावित पद्धतींना.


अजूनही पर्यावरणाची काळजी गणेशोत्सवात का करावी, तर या शेवटच्या घटनेचा विचार करा. दहा दिवस ज्या मूर्तीभोवती आपले आयुष्य फिरते, त्याच बाप्पाचे दुभंगलेले शरीर, अर्धे वाळूत रुतलेले, ‘आपल्याला कुणी खरे विसर्जन प्रदान करेल का?’ या प्रतीक्षेत आपला बाप्पा आपल्याला बघायला लागणे, इतके तरी आपण कलियुगात वाया जाऊ नये, असे मनापासून मला वाटते. हे घडते ’पीओपी’मुळे. ज्या दैवताची प्रार्थना ‘विघ्नहर्ता’ म्हणून करतो. त्यामुळेच पर्यावरणीय संकट यावे, हे तरी आपण थांबवू शकतो का? हाच प्रश्न आहे.

- डॉ. मयूरेश जोशी 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.